रेणुका शहाणे व आशुतोष राणा यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. या दोघांची ओळख १९९८ मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. पुढे दोघांची छान मैत्री झाली अन् या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन दोघांनीही २००१ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याचा विवाहसोहळा राणाजींच्या मध्य प्रदेशातील गावी २५ मे २००१ रोजी थाटामाटात पार पडला होता.
रेणुका शहाणेंनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी संवाद साधताना सासरचं कुटुंब, त्यांचं लग्न कुणी जुळवलं होतं याविषयी सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणाल्या, “माझ्या आजोबांपासून आमचं संपूर्ण कुटुंब नास्तिकच…आमच्या घरात फक्त संतांना मानलं जातं. त्यामुळे मी जेव्हा राणाजींबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि नंतर सासरी गेल्यावर जेव्हा अनेकांना मी डोक्यावर पदर घेतलेली दिसले तेव्हा त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. अरेच्चा! हे कसं काय झालं…लग्नानंतर हिचं ‘हम आपके है कौन’ झालं. पण, व्यक्तीस्वातंत्र्य, त्याचं महत्त्व हे सुद्धा मला माझ्या आईने शिकवलंय. राणाजींचा परिवार एकदम आस्तिक…त्यांच्याकडे अनेक प्रथा-परंपरा पाळल्या जातात.”
“राणाजी त्यांच्या आध्यात्मिक गुरूंना खूप मानतात. दद्दाजींनी आमच्या लग्नाचं सुचवलं होतं. राणाजींनी सुद्धा त्यांना पहिला प्रश्न हाच विचारला होता की, मी आस्तिक आहे आणि ती नास्तिक आहे…तर आमचं कसं काय जुळणार? त्यावेळी दद्दाजींनी राणाजींना विचारलं होतं, ‘जर तुझे दहा कार्यक्रम असतील तर त्यापैकी किती कार्यक्रमांना रेणुका उपस्थित असते?’ तर राणाजी म्हणाले, ‘साधारण आठ तरी कार्यक्रमांना तरी ती येतेच…जर तिला इतर कोणतंही काम नसेल तर ती सगळ्याच कार्यक्रमांना येईल’ मग, दद्दाजींनी त्यांना विचारलं, ‘मग तू तिच्या किती कार्यक्रमांना जातोस’, यावर राणाजी म्हणाले होते ३-४ कार्यक्रमांना जात असेन.”
“हे ऐकून दद्दाजी म्हणाले होते, ‘मग खरी आस्तिक कोण आहे? तिला माणसांमध्ये आस्था आहे…मूल्यांमध्ये आस्था आहे. रेणुका श्रद्धाहीन नाही…ती माणसांना जपते.’ तर, आमचं लग्न दद्दाजींनी ठरवून दिलं होतं. त्यांनीच आमचं लग्न ठरवल्यामुळे कुणीच काही बोलू शकलं नाही. दद्दाजींनी सांगितलं म्हणजे ती काळ्या दगडावरची रेष. त्यापुढचा प्रवासही महत्त्वाचा होता कारण, आमच्या घरची आणि त्यांच्या घरची या दोन्ही संस्कृती वेगळ्या होत्या. लग्नानंतर आपल्या पितृसत्ताक व्यवस्थेत ज्या परंपरा आहेत…त्या सगळ्या मी अनुभवल्या. कारण, माझ्यासाठी त्यांच्या कुटुंबातला एक भाग होणं महत्त्वाचं होतं.”
“जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा माझे सासरचे मुंबईतून आलेली, ‘हम आपके है कौन’ सिनेमात काम केलेली अभिनेत्री म्हणून माझ्याकडे बघत होते. त्यामुळे मी सुद्धा त्यांच्यामधली एक आहे हे त्यांना जाणवून देणं गरजेचं होतं. कालांतराने आम्हा सर्वांचं बॉण्डिंग, आमची नाती इतकी छान झाली की, आता माझ्या सासरचे मला इतका जीव लावतात आणि त्यांचं प्रेम माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. माझे सासरे नेहमी म्हणायचे, आयुष्यात कधीही तडजोड करावी लागली, जीवनात कितीही चढउतार आले तरीही, ‘First obey then argue’ म्हणजेच दुसऱ्याचा दृष्टीकोन आधी समजून घ्या आणि मग त्याच्यावर मत द्या. कोणत्याही नात्यात हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ही शिकवण मला माझ्या सासऱ्यांकडून मिळाली.” असं रेणुका शहाणेंनी सांगितलं.
