अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी चित्रपट आणि ओटीटी विश्वात महिलांना आता केवळ वहिनी आणि आईच्या भूमिकांपुरतं मर्यादित ठेवलं जात नाही असं म्हटलं आहे. महिला व्यक्तिरेखा आता अधिक सखोलपणे आणि स्वतंत्र विचार असलेल्या दाखवल्या जात आहेत. ‘दुपहिया’ या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये पुष्पलता या भूमिकेतून रेणुका शहाणे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यावेळी त्यांनी सांगितलं की, या भूमिकेमुळे त्यांना नेहमीच्या सरळसाध्या स्वभावाच्या सुनेच्या प्रतिमेपेक्षा वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणे यांनी ‘दुपहिया’च्या नव्या सीझनमधील व्यक्तिरेखांमध्ये झालेला बदल, या सीरिजच्या माध्यमातून स्वत:ला नव्या पद्धतीने सादर करण्याचा अनुभव आणि ‘दुपहिया’ विनोदाच्या माध्यमातून सामाजिक संदेश अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते, याबद्दल भाष्य केलं. नव्या सीझनमध्ये व्यक्तिरेखांमध्ये झालेल्या बदलाबद्दल बोलताना रेणुका शहाणे म्हणाल्या, “हो, व्यक्तिरेखेत बदल झाला आहे. सर्व व्यक्तिरेखांचं आकर्षण कायम आहे, पण या सीझनमध्ये वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतात.”
रेणुका शहाणे यांच्यासाठी ‘दुपहिया’ ही सीरिज स्वत:ला नव्या पद्धतीने सादर करण्याची संधीही ठरली आहे. याबद्दल त्या म्हणाल्या, “प्रत्येक कलाकाराला स्वत:मध्ये बदल करण्याची गरज असते आणि जेव्हा तुम्हाला तशा प्रकारच्या भूमिका साकारण्याची संधी मिळते, तेव्हाच हे शक्य होतं. मला वाटतं दुपहिया ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. ही माझी पहिली वेब सीरिज आहे आणि आता तिचा दुसरा सीझन येत आहे. तिच भूमिका पुन्हा साकारणं आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणखी वेगवेगळ्या छटा दाखवता येणं हा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “एक अभिनेत्री म्हणून या प्रवासात माझ्यातही खूप बदल झाला आहे आणि माझ्या सहकलाकारांकडून मी खूप काही शिकले आहे. त्यांच्याबरोबर काम करताना खूप मजा आली. केवळ ऑफस्क्रीनच नाही, तर ऑनस्क्रीनदेखील, कारण तुम्ही ज्या कलाकारांसह काम करता, त्यांची ऊर्जा आणि वातावरणही तुमच्यावर प्रभाव टाकतं.”
विनोदी भूमिका आणि महिलांसाठी लिहिल्या जाणाऱ्या व्यक्तिरेखा
रेणुका शहाणे यांनी सांगितलं की, त्यांना विनोदी भूमिका साकारायला नेहमीच आवडतं. मात्र, त्यांच्या प्रतिमेमुळे याआधी त्यांना अशा भूमिका फारशा मिळाल्या नाहीत. त्या म्हणाल्या, “मला विनोदी भूमिका साकारायला नेहमीच आवडतं, पण मला तशा भूमिका कोणी देत नव्हतं. माझी सोज्वळ सुनेची एक प्रतिमा तयार झाली होती. त्यामुळे दुपहियासारखी भूमिका साकारण्याची संधी मिळणं खूप दुर्मिळ होतं. ही संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे.”
महिला व्यक्तिरेखा लिहिण्याच्या पद्धतीतही मोठा बदल झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे अभिनेत्रींना वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्याची अधिक संधी मिळत आहे. त्या म्हणाल्या, “याआधी अनेकदा तुम्हाला कोणाची तरी आई किंवा सून यांसारख्या भूमिका साकाराव्या लागायच्या. अभिनेत्री म्हणून स्वत:ला वेगळ्या पद्धतीने सादर करण्याची फार कमी संधी मिळायची. या भूमिका साकारणं सोपं असतं. पण जेव्हा तुमच्याकडून पूर्णपणे वेगळ्या गोष्टीची अपेक्षा केली जाते, तुमच्यासाठी अपरिचित भाषा बोलावी लागते आणि तुम्ही ज्या वातावरणात वाढला आहात त्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या वातावरणात काम करावं लागतं, तेव्हा तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळते. पुष्पलताची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे.”
दरम्यान, ‘दुपहिया’चा दुसरा सीझन २ ऑक्टोबरपासून प्राइम व्हिडीओवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध झाला आहे. या सीरिजमध्ये गजराज राव, रेणुका शहाणे, स्पर्श श्रीवास्तव, शिवानी रघुवंशी, भुवन अरोरा, यशपाल शर्मा, अंजुमन सक्सेना आणि दिनेश लाल यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
