Renuka Shahane on Madhuri Dixit: माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे, सलमान खान, विकास बहल, अनुपम खेर, रीमा लागू अशा लोकप्रिय कलाकारांचा ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले होते. हा चित्रपट १९९४ ला प्रदर्शित झाला होता.
सध्या आऊटडोअर शूटिंग असले की कलाकारांसाठी व्हॅनिटी व्हॅन असतात, त्यामुळे दैनंदिन गरजा, आराम करण्यासाठी या व्हॅनिटी व्हॅनचा वापर केला जातो. पण, जेव्हा या व्हॅनिटी व्हॅन नव्हत्या, त्यावेळी कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे.
रेणुका शहाणे यांनी नुकतीच झूमला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ‘हम आपके है कौन’ चित्रपटाच्या आऊटडोअर शूटिंगवेळी माधुरी दीक्षितने स्वत:ची त्वचा खराब करून घेतली होती असे वक्तव्य केले. त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत हे जाणून घेऊ…
“यासाठी तिने पाणी…”
रेणुका शहाणे म्हणाल्या, “आम्ही ‘धिकताना’ या गाण्याच्या शूटिंगसाठी उटीला गेलो होतो. त्यामध्ये क्रिकेट खेळल्याचे आणि इतर सीनदेखील होते. माधुरीने माझी खूप मदत केली. तसेच काही गोष्टींची काळजी घ्यायला सांगितले. आऊटडोअर शूटिंगदरम्यान स्वच्छतागृहांची सोय नव्हती. स्वच्छतागृह वापरण्याची वेळ येऊ नये, ते शोधायला लागू नये यासाठी तिने पाणी पिणे टाळले होते. पण, पाणी न प्यायल्याने तिची त्वचा खराब झाली होती. तिने मला असे सांगितले की, मी पाणी न प्यायल्याने माझी त्वचा खराब झाली आहे.”
अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “माधुरीची त्वचा खराब झाली होती, त्यामुळे तिने मला इशारा दिला की तू पाणी जर प्यायली नाहीस, तुझी त्वचादेखील माझ्यासारखी होईल, त्यामुळे पाणी प्यायचे टाळू नकोस. आम्हाला जेव्हाही स्वच्छतागृह वापरायचे असेल, तेव्हा आम्ही आमच्या चार हेअर ड्रेसरला बरोबर घेऊन जायचो. गरज पडल्यास बाहेरही जायचो. आज आपण अशा गोष्टींचा विचारही करत नाही. आजच्याप्रमाणे सोयी सुविधा त्या काळात नव्हत्या.”
शूटिंगदरम्यान कलाकारांमध्ये कसे बॉण्डिंग होते, यावर रेणुका शहाणे म्हणाल्या, “त्या वेळी मेकअप व्हॅन वगैरे नसायच्या; त्यामुळे पुढच्या सीनच्या शूटिंगची जेव्हा तयारी सुरू असे, तेव्हा रीमाजी, अनुपमजी यांच्यासह सर्व कलाकार एकत्र येत असत. आम्ही खूप मजा करायचो, हसायचो. एकत्र आल्यानंतर आम्ही दम शराज खेळायचो.”
“सतीश शाहदेखील होते. आम्ही अनेक घटना आणि गोष्टींबद्दल बोलत असू. खूप मजा येत असे. सूरजजी नेहमी असे म्हणत असत की, या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना एका मराठी चित्रपटाचे शूटिंगदेखील होऊ शकते; कारण अधिकतर मराठी कलाकार होते”, असे म्हणत रेणुका शहाणे यांनी ‘हम आपके है कौन’ चित्रपटाच्या सेटवर कसे वातावरण असे याबद्दल वक्तव्य केले.
दरम्यान, ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाला मोठे यश मिळाले. आजही या चित्रपटाचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे.
