तीन दशकांनंतर अभिनेत्री रेणुका शहाणे १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या सूरज बडजात्या यांच्या ‘हम आपके हैं कौन’ या गाजलेल्या चित्रपटाच्या आठवणी तितक्याच उत्सुकतेने सांगत असतात. या चित्रपटाची आजही तितकीच क्रेझ आहे. या चित्रपटात पूजा चौधरीची भूमिका साकारणाऱ्या रेणुका शहाणे यांनी सलमान खान, माधुरी दीक्षित आणि दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी यावेळी सलमान खान खूप मस्तीखोर होता असं म्हटलं आहे.

शूटिंगदरम्यान सलमान खान नेहमीच मस्ती आणि खोड्या करत असायचा, असं रेणुका शहाणे यांनी सांगितलं. मात्र, त्याचबरोबर त्यांनी सलमानच्या सहकलाकारांप्रती असलेल्या उदार स्वभावाचंही कौतुक केलं. ‘व्हरायटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणे यांनी या चित्रपटातील सहकलाकार आणि शूटिंगदरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला. सलमान खानबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “सलमान खूप खोडकर होता. पण आम्ही मोठे टेक्स करत असताना तो सगळ्यांचं खूप कौतुक करायचा.”

रेणुका शहाणे माधुरी दीक्षितबद्दल काय म्हणाल्या?

माधुरी दीक्षितबद्दलही रेणुका यांनी प्रेमाने सांगितलं. “माधुरी आणि माझं पडद्यावर आणि पडद्यामागेही खूप छान नातं आहे. तिच्याबरोबर काम करणं माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं. मी आजवर ज्या सर्वोत्तम सहकलाकारांबरोबर काम केलं आहे, त्यापैकी ती एक आहे. मी आजही माझ्या या मतावर ठाम आहे. ती एक अप्रतिम अभिनेत्री आहे,” असं त्या म्हणाल्या. राजश्री प्रॉडक्शन्स आणि सूरज बडजात्या यांच्याबद्दल बोलतानाही रेणुका यांनी त्यांचं कौतुक केलं. “राजश्री प्रॉडक्शन्सबरोबर काम करण्याच्या आठवणीही माझ्याबरोबर आहेत. सूरज बडजात्या हे सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत,” असं त्यांनी सांगितलं.

कौटुंबिक चित्रपट आजही महत्त्वाचे का आहेत, यावर रेणुका शहाणे यांचं भाष्य

सूरज बडजात्या आजही कौटुंबिक मनोरंजनावर आधारित चित्रपट बनवतात. त्यांचा आगामी ‘ये प्रेम मोल लिया’ हा चित्रपट त्यांच्या या प्रवासातील पुढचा चित्रपट असणार आहे.रेणुका शहाणे यांना वाटतं की सूरज बडजात्या यांची कौटुंबिक मनोरंजनाची शैली आजही प्रेक्षकांना आवडू शकते. विशेषतः सध्या संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहता येतील असे चित्रपट थिएटरमध्ये कमी पाहायला मिळतात. त्या म्हणाल्या, “हो, लोकांना कुटुंबासोबत पाहता येतील अशा गोष्टी हव्या आहेत. असे कौटुंबिक मनोरंजक चित्रपट आता फार कमी झाले आहेत. मला खात्री आहे की लोकांना कुटुंबासोबत चित्रपट पाहायला आवडेल. लहान मुलांनाही आजी-आजोबांसोबत जाऊन चित्रपट पाहायला आवडेल. त्याचा अनुभवच वेगळा असतो.”