Renuka Shahane Spoke ABout Chakda Xpress Release Issue : रेणुका शहाणे मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर मराठी व हिंदी चित्रपटांत आणि मालिकेत काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. रेणुका यांनी इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर आतापर्यंत काम केलं आहे. यापैकीच एक म्हणजे अनुष्का शर्मा.
अनुष्का शर्मा २०२१ मध्ये मुलीच्या जन्मानंतर अभिनयक्षेत्रात पुनरागमन करण्यास सज्ज होती, त्यावेळी तिने झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित चरित्रपटाचं ‘चकदा एक्स्प्रेस’चं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. यामध्ये रेणुका शहाणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
‘चकदा एक्स्प्रेस’ हा चित्रपट माजी भारतीय महिला क्रिकेटर झुलन गोस्वामी यांच्यावर आधारित आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. परंतु, अद्याप हा चित्रपट प्रदर्शित झाला नाहीये. ‘फ्री प्रेस जरनल’च्या वृत्तानुसार पूर्वी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होता. परंतु, काही कारणांनी ती डील रद्द झाली. आता यातील अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी याबाबत त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार आता हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण पूर्ण झाल्यामुळे ही धक्कादायक गोष्ट आहे. अशातच आता रेणुका यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केल्याचं दिसतं. यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता त्यांनी इन्स्टाग्रामवर या चित्रपटातील लूकचा फोटो शेअर केला आहे.
रेणुका शाहणे यांची प्रतिक्रिया
रेणुका शहाणे म्हणालेल्या, “चकदा एक्स्प्रेसमधील माझा लूक मला खूप आवडला होता. मला या चित्रपटात आणि टीमबरोबर काम करूनही खूप मजा आली. चित्रपट प्रदर्शित झाला असता तर बरं झालं असतं.” पूर्वी ‘एनडी टीव्ही’शी संवाद साधताना रेणुका यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिलेली. त्या म्हणालेल्या, “मला खूप वाईट वाटलं, कारण या चित्रपटासाठी प्रत्येकाने खूप मेहनत घेतली होती. अनुष्कानेही यासाठी स्वत:वर खूप काम केलं होतं. यामध्ये मी जे सीन केले, ते खूप चांगले होते आणि म्हत्त्वपूर्ण होते. विशेष करून क्रीडा क्षेत्रातील स्त्रियांसाठी हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे.”

अभिनेत्री पुढे म्हणालेल्या, “झुलन गोस्वामी खूप छान आहेत. गरीब कुटुंबातून असतानाही त्यांनी मेहनतीने इतकं सगळं मिळवलं. तरीसुद्धा पुरुष व महिला खेळाडूंमधील भेदभाव याबद्दल आजही बोललं जातं, त्यामुळे मला वाटतं, ‘चकदा एक्स्प्रेस’ हा क्रीडा विषयाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे.”

