Renuka Shahane on Shah Rukh Khan: रेणुका शहाणे यांनी बॉलीवूडच्या काही मोजक्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, त्यांनी साकारलेल्या भूमिकांना मोठी लोकप्रियता मिळाली. इतकेच काय, पण त्यांनी टीव्हीवरदेखील काम केले आहे.

सर्कस या मालिकेत त्यांनी काम केले आहे. या मालिकेत शाहरुख खान प्रमुख भूमिकेत होता. या मालिकेत शाहरुख खानबरोबर काम करण्याचा अनुभव, शाहरुख खानचे त्यांच्याबद्दल काय मत होते, याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत वक्तव्य केले.

“शाहरुखला सुरुवातीला माझ्याबद्दल…”

रेणुका शहाणेंनी झूमला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मी सर्कसच्या ऑडिशनसाठी गेले; पण मी ज्या भूमिकेसाठी ऑडिशन देणार होते, त्या भूमिकेची स्क्रिप्ट नव्हती. ती शाहरुखच्या मैत्रिणीच्या भूमिकेची स्क्रिप्ट होती, जी त्याच्याबरोबर परदेशातून येते. ती खूप छोटी भूमिका होती. त्या भूमिकेची स्क्रिप्ट नव्हती. त्यामुळे त्यांनी मला मारियाच्या भूमिकेची स्क्रिप्ट दिली. त्यावर परफॉर्म करायला सांगितले. ते म्हणाले की, आम्ही ठरवू.”

“माझ्या ऑडिशननंतर अझीझ मिर्झा आणि त्यांची संपूर्ण टीमला मी मारियाची भूमिका साकारावे, असे वाटत होते. शाहरुख खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेत्री म्हणाली, “शाहरुख खानचा गर्व वाटतो. सध्या ज्या प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं तो काम करतो, तसेच तो त्यावेळीदेखील करायचा. तो कामाशिवाय इतर कशाकडेही पाहत नसे. तो त्याच्या कामाप्रति १०० टक्के नाही, तर २०० टक्के समर्पित असायचा. त्याचं एकच ध्येय असायचं की, तो ज्या सीनमध्ये आहे, तो सीन उत्तम झाला पाहिजे. त्याचा तो अ‍ॅटिट्यूड मला पहिल्या दिवसापासूनच दिसला होता.”

अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “शाहरुखला सुरुवातीला माझ्याबद्दल साशंकता होती. कारण- त्याआधी मी काम केलं नव्हतं. शाहरुखनं ‘फौजी’मध्ये काम केलं होतं. तो लोकप्रिय झाला होता. जेव्हा त्यानं माझा पहिला सीन पाहिला तेव्हा तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की, तू छान काम केलं आहेस.”

रेणुका शहाणे असेही म्हणाल्या की, शाहरुख खूप आदरानं वागायचा. रेणुका शहाणे यांनी या मालिकेनंतर चित्रपटांत काम केले. मराठी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या. काही चित्रपटांची निर्मितीही केली. तर शाहरुख खानने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे एक वेगळे नाव निर्माण केले आहे. आज त्याला चाहते किंग खान म्हणून ओळखतात.