Kangana Ranaut Kriti Sanon Ad Controversy : अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौत यांनी अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या रक्षाबंधनच्या जाहिरातीवर टीका केली आहे. रक्षाबंधनच्या या जाहिरातीत क्रिती सेनॉनने परिधान केलेल्या पोशाखामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला. असे कपडे का घातले गेले आहेत? असा प्रश्न नेटकरी विचारू लागले. ज्यानंतर कंगनानेही क्रितीला एक प्रश्न केला. ज्यावर क्रितीने उत्तर दिलं. एवढंच नाही तर आता क्रितीची बहीण नुपुरने ही कंगना रणौतला उत्तर दिलं.

नेमकं प्रकरण काय आहे?

अभिनेत्री क्रिती सेनॉन नुकतीच एका ज्वेलरी ब्रँडच्या रक्षाबंधनच्या जाहिरातीत दिसली होती. या जाहिरातीत सण साजरा करताना तिने ऑफ-व्हाइट रंगाचा ब्रालेट-स्टाईल ब्लाउज, त्यावर केप आणि ड्रेप्ड स्कर्ट परिधान केला होता. तिचा हा पोशाख रक्षाबंधन साठी शोभत नाही असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. एवढंच नाही तू असे कपडे घालून संस्कृती बिघडवते आहेस वगैरे टीकाही केली. पण क्रिती शांत होती. अभिनेत्री आणि खासदार कंगनाने मात्र क्रितीला जे खडे बोल ऐकवले त्यानंतर तिने सडेतोड उत्तर दिलं.

कंगनाने काय म्हटलं होतं?

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये क्रिती सेनॉनचे थेट नाव घेतले नसलं, तरी तिने क्रितीवर या ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीवरून सुरू असलेल्या वादावरच भाष्य केलं. कंगना पोस्टमध्ये म्हणते, “महिलांसाठी हा खूप चांगला काळ आहे, आपल्या कपाटात वेगवेगळ्या कपड्यांचे अनेक पर्याय आहेत. आजची महिला ही जागतिक महिला आहे. कॉकटेल ड्रेसेसपासून ते लहेंगा चोली, जीन्स ते साडी आणि बिकिनीपासून ते सलवार कमीजपर्यंतचे अनेक पर्याय आज उपलब्ध असताना, तुम्ही तुमच्या भावाला बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांमध्ये राखी का बांधाल? तुमचे इतर स्टायलिंगचे पर्याय कुठे गेले?” असा प्रश्न कंगनाने केला. ज्यावर क्रितीने सडेतोड उत्तर दिलं.

क्रितीची पोस्ट काय?

क्रिती सेनॉन म्हणाली, कुठल्याही सणांचं सौंदर्य हे कपड्यांमध्ये नसतं. त्याबाबतच्या भावनांमध्ये ते सौंदर्य असतं. या भावनाच आपल्याला आपल्या परंपराशी जोडून ठेवतात. आपण महिलांना हे सांगणं कधी बंद करणार आहोत की त्यांनी काय कपडे घातले पाहिजेत? एथनिक फॅशनमध्ये वेळेनुसार बराच बदल झाला आहे. मात्र आजही एखाद्या महिलेचं मूल्यमापन, ती संस्कृती टिकवते आहे की नाही हे सगळं तिच्या कपड्यांवरुनच जोखलं जातं. संस्कृती आणि परंपरा ही स्त्रियांच्या मनात असते. त्यांच्या कपड्यांमध्ये किंवा कपड्यांच्या नेकलाईनमध्ये नसते असं म्हणत क्रितीने कंगनाला उत्तर दिलं. यानंतर क्रितीच्या बहिणीनेही कंगना रणौतला उत्तर दिलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

क्रितीची बहीण नुपुरने काय म्हटलं आहे?

नुपुरनेही क्रितीची पोस्ट शेअर केली आहे आणि म्हटलं आहे, फक्त कल्पना करा की एक स्त्री काय परिधान करते त्याबाबत दुसऱ्या स्त्रीला एवढा त्रास होतो आहे. तुम्ही प्रगती करा पण महिलांचा आदरही करा. शिवाय मला एक प्रश्न आहे की ती ज्याला राखी बांधते आहे त्याला काही प्रश्न नाही. जिने कपडे घातले आहेत तिला काही प्रश्न नाही मग तुम्हाला का इतका त्रास होतो आहे?