Why Rimi Sen quit Bollywood : एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री रिमी सेनने अभिनयाला रामराम ठोकून दुबईमध्ये स्वतःचा रिअल इस्टेट व्यवसाय सुरू केला आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील वास्तव आणि तिच्या नवीन करिअरबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं. बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींचे करिअर फार काळ टिकत नाही. रिअल इस्टेट व्यवसायाला अभिनयापेक्षा जास्त स्थिर आहे, असं मत रिमीने व्यक्त केलं.
‘बिल्डकॅप्स’च्या पॉडकास्टमध्ये रिमी अनुभवी रिअल इस्टेट बिझनेसमन आशिष शर्माबरोबर सहभागी झाली होती. यावेळी आशिषने रिमीचं कौतुक केलं. “रिमी जी काहीतरी आमच्यासाठीही ठेवा, तुम्ही तर अख्ख्या दुबईत बिझनेस पसरवलाय. इथे पोहोचण्यासाठी आम्हाला १८ वर्षे लागली आणि तुम्ही खूप कमी कालावधीत यश मिळवलं,” असं आशिष म्हणाला. त्यावर रिमी उत्तर देत म्हणाली, “रिअल इस्टेट हा एक स्थिर व्यवसाय आहे. बॉलीवूडची नशा उतरली, आता मला रिअल इस्टेटमध्ये रस आहे.”
बॉलीवूड पुरुषप्रधान इंडस्ट्री – रिमी सेन
चित्रपटसृष्टीमधील करिअरबद्दल रिमी म्हणाली, “चित्रपटसृष्टीतील करिअर फार काळ टिकणारं नसतं, खासकरून अभिनेत्रींसाठी. अभिनेते आजही या फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत, कारण ही पुरुषप्रधान इंडस्ट्री आहे. आजही सलमान खान आणि शाहरुख खानसारखे अभिनेते २०-२५, ३० वर्षांनंतरही चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत.”
“ज्या अभिनेत्रींनी एकेकाळी या अभिनेत्यांबरोबर नायिकेची भूमिका केली होती, त्याच आता सहाय्यक भूमिका किंवा इतर छोट्या भूमिका साकारत आहेत. त्यापैकी काहीजणी आता पडद्यावर त्यांच्या आईची भूमिकाही करत आहेत. या इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींसाठी करिअरचा कालावधी खूपच कमी असतो,” असं रिमी सेन म्हणाली.
प्रसिद्धीची नशा हे एक व्यसन – रिमी सेन
रिमी सेनने स्टारडमला एक प्रकारचं व्यसन म्हटलंय. “मला वाटतं की प्रसिद्धीची नशा हे जुगारासारखंच एक व्यसन आहे. जुगार ही समस्या नाही, कारण हुशार माणसाला माहित असतं की टेबलवरून कधी उठायचं. कोणत्याही व्यवसायात, जेव्हापर्यंत तुमच्याकडे आदर आणि नाव दोन्ही असतं तेव्हा त्यातून कधी बाहेर पडायचं हे समजून घेणं महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्येही असंच असतं,” असं मत रिमी सेनने व्यक्त केलं.
व्यवसायात दृष्टीकोन स्पष्ट असावा लागतो
“कोणताही व्यवसाय करताना, त्यामागचा तुमचा दृष्टिकोन स्पष्ट असावा लागतो. त्याशिवाय कोणत्याही व्यवसायात फक्त प्रवाहाबरोबर वाहत राहिलात, तर तुम्हाला आयुष्यभर संघर्ष करावा लागेल. तुम्ही दिशाहीन असाल आणि काम करून शेवटी थकून जाल. मी सुरुवातीपासूनच अभिनयाकडे एक व्यवसाय म्हणून पाहिलं. मला माहित होते की मी या इंडस्ट्रीत किती काळ टिकू शकते. कारण अभिनेत्रींच्या करिअरला एका काळानंतर उतरती कळा लागते आणि नंतर तुम्हाला भविष्यासाठी दुसरा मार्ग शोधावा लागतो,” असं रिमी सेन म्हणाली.
“सुदैवाने, मला कधीही प्रसिद्धीचं व्यसन नव्हतं. जोपर्यंत मला चांगलं काम मिळत होतं, तोपर्यंत मी अभिनय केला. पण मग मला पुन्हा पुन्हा त्याच प्रकारच्या विनोदी चित्रपटांच्या भूमिका मिळू लागल्या, त्याने मी समाधानी नव्हते, मग मी ठरवलं की मी काम करेन, कार्यक्रम करेन, चित्रपट करेन, पैसे कमवेन आणि मग पुढे जाईन. त्यानंतर, मी निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. पुढे तेही सोडलं आणि रिमी कायमची भारत सोडून दुबईत निघून गेली,” असं रिमीने सांगितलं.
