३० सप्टेंबर रोजी कर्नाटकसह देशभरात ‘कांतारा’ हा कन्नड चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अन्य भाषिक प्रेक्षकांमध्ये वाढणारी लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी हा चित्रपट इतर भाषांमध्ये डब करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. रिषभ शेट्टी यांनी चित्रपटामध्ये प्रमुख पात्र साकारले आहे. त्यांनी ‘कांतारा’चे दिग्दर्शन आणि लेखन देखील केले आहे. किच्चा सुदीप, पृथ्वीराज अशा दाक्षिणात्य सुपरस्टार्ससह बॉलिवूडमधील काही कलाकारांनी रिषभ यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

अभिनेत्री कंगना रणौतने नुकताच हा चित्रपट पाहिला. तिने या चित्रपटाचे कौतुक करत एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तसेच कंगनाने ‘हा चित्रपट ऑस्कर २०२४ ला भारताकडून पाठवण्यात यावा’ असे वक्तव्य केले आहे. तिने या संदर्भामध्ये इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. यामध्ये तिने “माझ्या मते, पुढच्या वर्षी ‘कांतारा’ ऑस्करसाठी पाठवण्याच्या योग्यतेचा आहे. पुढच्या वर्षभरात चांगले चित्रपट येणार आहेत हे मला ठाऊक आहे. पण सध्या जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य चित्रपट निवडण्याची गरज आहे” असे म्हटले होते.

आणखी वाचा – “आता दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणार…” संजय दत्तचं विधान चर्चेत; बॉलिवूडकरांनाही सुनावलं

रिषभ शेट्टी यांनी केलेल्या कौतुकाबद्दल कंगनाचे आभार मानले आहेत. फिल्मीबिटला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले, “जेव्हा मी तिचा मेसेज पाहिला, तेव्हा लगेच तो मी माझ्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आणि तिला टॅग केले. आपल्या देशातल्या मातीच्या जवळचा, प्रादेशिक चित्रपट सर्वाना आवडत आहे हे पाहून मी फार खूश आहे. प्रादेशिक चित्रपट हे नेहमीच जागतिक दर्जाचे असतात असे मला वाटते. ‘कांतारा’ची कथा माझ्या गावामधली आहे, जी आज जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचली आहे. चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिसाद मिळत आहे. लोकांनी विश्वास, परंपरा, प्रथा अशा गोष्टी जवळच्या वाटू लागल्या आहेत. लेखक म्हणून मी खूप जास्त खूश आहे.”

आणखी वाचा – ५३व्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांचा झेंडा, प्रवीण तरडेंच्या ‘धर्मवीर’चाही समावेश

‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार एका मुलाखतीमध्ये या चित्रपटाच्या पुढील भागाबद्दल खुलासा केला आहे. या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे या दुसऱ्या भागासाठी रिषभ स्वतः उत्सुक आहे, कारण या कथेत अशा आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्या आधारावर या चित्रपटाचं एका युनिव्हर्समध्ये रूपांतर करता येऊ शकतं, एवढंच नाही तर या चित्रपटाचा प्रीक्वलही निघू शकतो. असं रिषभने यात नमूद केलं आहे.