Raj Kapoor Vyjayanthimala Affair Rishi Kapoor Book: राज कपूर यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. मात्र, त्यांच्या चित्रपटांइतकीच त्यांच्या खासगी आयुष्यातील अफेअर्सची नेहमीच चर्चा रंगली. राज कपूर यांचे अभिनेत्री नर्गिस आणि वैजयंतीमाला यांच्याशी असलेल्या संबंधांवर त्यांचे दिवंगत सुपुत्र ऋषी कपूर यांनी आपल्या ‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केले होते. ऋषी कपूर यांनी लिहिले होते की, जेव्हा त्यांच्या वडिलांचे वैजयंतीमाला यांच्याबरोबर अफेअर सुरू होते, तेव्हा त्यांच्या आई कृष्णा कपूर यांनी घरातून थेट बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आईने हार न मानता ऋषी कपूर यांच्यासह मरीन ड्राईव्हवरील ‘नटराज हॉटेल’ आणि नंतर चित्रकूटमधील एका अपार्टमेंटमध्ये दोन महिने घालवले होते. राज कपूर यांनी तो चॅप्टर पूर्णपणे संपवेपर्यंत आईने घरात पाऊल ठेवले नाही, असं त्यांनी पुस्तकात लिहिलंय.

दोन महिने घर सोडून गेल्या होत्या कृष्णा कपूर

“माझ्या वडिलांचं नर्गिस जींशी (Raj Kapoor Nargis Affair) अफेअर होतं, तेव्हा मी खूप लहान होतो, त्यामुळे त्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. मलाही त्यामुळे घरात काही घडल्याचं आठवत नाही. पण मला आठवतं की बाबांचं वैजयंतीमाला यांच्याशी अफेअर होतं, तेव्हा मी आईबरोबर मरीन ड्राईव्हवरील नटराज हॉटेलमध्ये शिफ्ट झालो होतो,” असं ऋषी कपूर यांनी या पुस्तकात लिहिलं आहे. “माझ्या आईने यावेळी माघार न घेण्याचा निर्णय घेतला होता. हॉटेलमधून आम्ही दोन महिन्यांसाठी चित्रकूटमधील एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालो. माझ्या वडिलांनी आई आणि आमच्यासाठी अपार्टमेंट विकत घेतलं होतं. त्यांनी आई परत यावी यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यांनी जोपर्यंत आयुष्यातील तो चॅप्टर संपवला नाही, तोवर आईने हार मानली नाही,” असा उल्लेख पुस्तकात आहे.

ऋषी कपूर यांना वैजयंतीमालांचा राग आला होता

वैजयंतीमाला यांनी अफेअरची बातमी फेटाळल्यावर राग आला होता, असं ऋषी कपूर यांनी या पुस्तकात लिहिलं आहे. “काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका मुलाखतीत वैजयंतीमाला यांनी माझ्या वडिलांबरोबर कधीच अफेअर नव्हतं असा दावा केला होता. माझ्या वडिलांना प्रसिद्धीची भूक होती, त्यामुळे या गोष्टी पसरवल्या असंही त्या म्हणाल्या होत्या. मला फार राग आला होता. त्या असं कसं म्हणू शकतात. त्यांना या गोष्टी बोलण्याचा अधिकार नव्हता कारण स्वतःची बाजू मांडण्यासाठी माझे वडील तेव्हा जिवंत नव्हते.”

माझ्या वडिलांना प्रसिद्धीची भूक होती असं…

ऋषी कपूर यांनी पुस्तकात लिहिलंय की जेव्हा वैजयंतीमाला यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले तेव्हा अनेकांनी त्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली होती. “काळानुसार माझा राग कमी झाला आहे. काही कारणास्तव लोक अनावश्यक तथ्यांवर लक्ष केंद्रीत करतात, हे सत्य मी स्वीकारलंय. पण मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो की जर बाबा हयात असते तर त्यांनी अफेअरची गोष्ट फेटाळली नसती किंवा माझ्या वडिलांना प्रसिद्धीची भूक होती, असं म्हटलं नसतं,” असंही या पुस्तकात ऋषी कपूर यांनी लिहिलंय.

राज कपूर आणि वैजयंतीमाला यांनी सर्वात आधी १९६१ मध्ये आलेल्या ‘नजराना’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर त्यांनी राज कपूर दिग्दर्शित ‘संगम’मध्ये एकत्र काम केलं होतं.