Rishi Kapoor Lifetime Achievement Award : ५ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ च्या निमित्ताने या पुरस्कार सोहळ्याच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला जात आहे. अशीच एक अविस्मरणीय आठवण २०१६च्या ‘स्क्रीन अवॉर्ड्स’ सोहळ्यातील आहे, जेव्हा ज्येष्ठ अभिनेते दिवंगत ऋषी कपूर यांना ‘जीवनगौरव’ (Lifetime Achievement Award) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचे अमूल्य योगदान आणि प्रेक्षकांच्या मनातील त्यांचे स्थान… यामुळेच त्यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराचा सन्मान देण्यात आला होता. त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या करण जोहर आणि कपिल शर्मा यांनी हा क्षण अधिकच खास बनवला होता. कपिल शर्माने आपल्या सुमधुर आवाजात ऋषी कपूर यांची ‘मै शायर तो नही’, ‘चेहरा है या चांद खिला है’ आणि ‘दर्द-ए-दिल’ ही लोकप्रिय गाणी गात त्यांना मंचावर आमंत्रित केले होते. यावेळी कपिलने प्रेक्षकांना “तुमचे ऋषी कपूर यांच्यावर प्रेम आहे का? माझे तर खूप आहे!” असे विचारत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

जेव्हा ऋषी कपूर यांच्या नावाची घोषणा झाली, तेव्हा मंचावर जाण्यापूर्वी त्यांनी अमिताभ बच्चन यांची गळाभेट घेतली होती, जो क्षण सर्वांच्या लक्षात राहिला होता. ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचे नाते अत्यंत जवळचे होते. त्यांनी ‘अमर अकबर अँथनी’, ‘नसीब’, ‘कभी कभी’ आणि ‘कुली’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.

Award Banner

ऋषी कपूर यांनी सिमी गरेवाल यांचे मानलेले आभार

मंचावर ऋषी कपूर यांच्याबरोबर त्यांची पहिली नायिका सिमी गरेवाल उपस्थित होत्या. यावेळी ‘मेरा नाम जोकर’ (१९७०) या आपल्या पहिल्या चित्रपटावेळी सिमी गरेवाल यांनी केलेले मार्गदर्शन आणि दिलेल्या पाठिंब्याबद्दल ऋषी कपूर यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती.

ऋषी कपूर अभिनेत्री सिमी गरेवाल यांच्याबद्दल म्हणालेले…

पुरस्कार स्वीकारताना ऋषी कपूर भावूक होऊन म्हणाले होते, “मी माझ्या कारकिर्दीत २३-२४ अभिनेत्रींना या चित्रपटसृष्टीत येण्याची संधी दिली आणि लोक त्याचे श्रेय मला देतात. पण मला कोणीही विचारले नाही की माझी या इंडस्ट्रीशी ओळख कुणी करून दिली? ती व्यक्ती म्हणजे सिमी गरेवाल.” त्यांनी पुढे सिमी गरेवाल यांचे आभार मानताना म्हटले होते की, “सिमी, तू ज्या धैर्याने आणि प्रेमाने माझा हात धरून मला ‘मेरा नाम जोकर’मध्ये मार्गदर्शन केलं, त्यासाठी मी तुझा कायम ऋणी राहीन.” शेवटी त्यांनी आपल्याबरोबर काम करणाऱ्या सर्व सह कलाकारांचे आणि आपल्या कुटुंबाचेही आभार मानले.