Amitabh Bachchan Coolie Accident : १९८३ मधील ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला होता. सह-कलाकार पुनीत इस्सार यांच्याबरोबरच्या एका फायटिंग सीनमध्ये टायमिंग चुकल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर काही काळासाठी क्लिनिकली मृत घोषित केलेल्या अमिताभ यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्या, त्यानंतर ते बरे झाले. या अपघातानंतर तीन महिन्यांनी अमिताभ बच्चन जेव्हा मुंबईतील सेटवर ‘कुली’च्या क्लायमॅक्सचे शूटिंग करण्यासाठी परतले, तेव्हा त्यांना पाहण्यासाठी जवळपास एक लाख चाहत्यांचा जनसागर लोटला होता. जमाव इतका बेकाबू झाला होता की पोलिसांचे नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि शेवटी परिस्थिती सावरण्यासाठी निर्मात्यांना स्थानिक गुंडांची मदत घ्यावी लागली होती. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी अमिताभ बच्चन यांच्या या न भूतो न भविष्यती अशा क्रेझचा डोळ्यांनी पाहिलेला थरारक अनुभव शेअर केला होता.

काही वर्षांपूर्वी ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत ऋषी कपूर यांनी अमिताभ यांच्या लोकप्रियतेचा स्वतः अनुभवलेला किस्सा शेअर केला होता. “राजेश खन्ना किती मोठे सुपरस्टार होते हे मला माहीत नाही, पण मी त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. पण, मी स्वतः अमिताभ बच्चन यांची क्रेझ स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. मी त्यांच्याबरोबर घडलेला एक प्रसंग सांगतो.”

अमिताभ बच्चन बरे होऊन सेटवर परतले तेव्हा…

“मृत्यूच्या दारातून परत आल्यानंतर, अमित जी बरे झाले आणि ‘कुली’चे शूटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी सेटवर आले. आम्ही त्यावेळी मुंबईत शूटिंग करत होतो आणि क्लायमॅक्सचा सीन शूट होत होता. लायटिंगची तयारी होईपर्यंत आम्हाला तंबूमध्ये आराम करावा लागायचा. प्रत्येक कलाकारासाठी वेगळा तंबू होता,” असं ऋषी कपूर यांनी सांगितलं होतं.

amitabh-bachchan-coolie-accident-rishi-kapoor
कुली चित्रपटातील एक दृश्य

गर्दी आवरण्यासाठी स्थानिक गुंडांना बोलावावं लागलं होतं

अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी किती गर्दी झाली होती, त्याबद्दल ऋषी कपूर यांनी सांगितलं. “आम्ही आमच्या तंबूमध्ये बसलो होतो. त्यावेळी अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी जवळपास एक लाख लोक आले होते. पोलिसांनाही त्या गर्दीवर नियंत्रण मिळवता येत नव्हतं. शेवटी त्या प्रचंड गर्दीला आवरण्यासाठी निर्मात्यांना परिसरातील स्थानिक गुंडांना बोलवावं लागलं होतं. पोलिसांना ती गर्दी सांभाळणे अशक्य झालं होते. अशी अमिताभ बच्चन यांची क्रेझ होती,” असं ऋषी कपूर म्हणाले होते.

ऋषी कपूर व अमिताभ बच्चन यांच्यात तणाव

आपल्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रात ऋषी कपूर यांनी अमिताभ आणि त्यांच्यामध्ये एकेकाळी तणाव असल्याचं कबूल केलं होतं. “मी हे मान्य करतोय की त्या दिवसांत अमिताभ बच्चन आणि माझ्यामध्ये तणाव, अबोला होता. आम्ही त्याविषयी कधीच बसून बोललो नाही आणि सुदैवाने तो तणाव आपोआपच दूर झाला. ‘अमर अकबर अँथनी’ चित्रपट केल्यानंतरच आमच्यात मैत्री झाली,” असं ऋषी कपूर यांनी पुस्तकात लिहिलं आहे.

“मला सांगावं वाटतंय की माझी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अजूनही एक तक्रार आहे. त्या काळात मल्टीस्टारर चित्रपटात काम करण्याचा एक मोठा तोटा असा होता की, प्रत्येकाला फक्त ॲक्शन चित्रपटच बनवायचा होता. त्यामुळे जो अभिनेता चांगले अॅक्शन सीन करायचा, त्यालाच सर्वात महत्त्वाची भूमिका मिळे. दिग्दर्शक आणि लेखक नेहमीच अमिताभ बच्चन यांच्यासाठी चांगली आणि मध्यवर्ती भूमिका राखून ठेवायचे. आणि हे फक्त माझ्याबरोबरच घडत नव्हतं, तर शशी कपूर, शत्रूघ्न सिन्हा, धर्मेंद्र आणि विनोद खन्ना यांच्याही बाबतीत घडत होतं,” असं ऋषी कपूर म्हणाले होते.