Rishi Kapoor-Salim Khan Controversy: ऋषी कपूर यांनी १९७३ मध्ये ‘बॉबी’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी ते २१ वर्षांचे होते. पहिल्याच सिनेमातून ऋषी कपूर यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
“मुंबईतील एका हॉटेलमध्ये मी स्नूकर खेळत होतो, त्यावेळी सलीम साहेब तिथे…”
पुढे त्यांना सलीम खान व जावेद अख्तर या जोडीने लिहिलेल्या एका भूमिकेसाठी विचारणा झाली. त्यावेळी ऋषी कपूर यांनी त्यांना नकार दिला. मात्र, सलीम खान यांना ते आवडले नाही. त्यांनी ऋषी कपूर यांना काय सांगितले, याबद्दल त्यांनी खुल्लम खुल्लामध्ये लिहिले आहे.
ऋषी कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले, “मुंबईतील एका हॉटेलमध्ये मी स्नूकर खेळत होतो, त्यावेळी सलीम साहेब तिथे आले आणि मला म्हणाले, सलीम-जावेदला नाही म्हणायची तुझी हिंमत कशी झाली? त्यावर मी त्यांना उत्तर दिले की मला ही भूमिका आवडली नाही.”
पुढे काय घडले हे सांगत ऋषी कपूर यांनी लिहिले, “त्यावर सलीम खान यांनी अमिताभ बच्चन यांना लॉन्च केल्याबद्दल बढाया मारल्या आणि राजेश खन्ना यांनी त्यांना एकदा नकार दिला होता आणि अमिताभ बच्चन इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर त्यांचे करिअर संपुष्टात आल्याचे सांगितले. प्रेक्षकांना अमिताभ यांच्यासारखा नायक चित्रपटात पाहिजे होता. सलीम साहेबांनी मला सांगितले, तुला माहीत आहे का? आजपर्यंत आम्हाला कोणीही नाही म्हणू शकले नाही. आम्ही तुझे करिअर उद्ध्वस्त करू शकतो.”
पुढे त्यांनी लिहिले, “जेव्हा मी सलीम खान यांना विचारले की त्यांच्या मनात काय आहे? ते मला म्हणाले की तुझ्याबरोबर कोण काम करेल? तुला माहिती आहे का, की आम्ही राजेश खन्ना यांना ‘जंजीर’ चित्रपटाची ऑफर दिली होती आणि त्यांनी आम्हाला नकार दिला. आम्ही त्यांना काही केले नाही, पण आम्ही त्यांना पर्याय निर्माण केला. अमिताभ बच्चन यांना राजेश खन्नांचा पर्याय म्हणून उभे केले. अमिताभ बच्चन, ज्यांनी राजेश खन्नांना उद्ध्वस्त केले. ते बॉलीवूडमध्ये आल्यानंतर राजेश खन्नांचे करिअर संपले. आम्ही तुझ्याबरोबरदेखील अगदी तसेच करू”, असे सलीम खान यांनी म्हटल्याची आठवण ऋषी कपूर यांनी त्यांच्या जीवनचरित्रात लिहिली आहे. हा वाद पुढे वाढवला नसल्याचे ऋषी कपूर यांनी लिहिले आहे.
विशेष म्हणजे, ‘बॉबी’ आणि ‘जंजीर’ हे दोन्ही चित्रपट १९७३ मध्ये प्रदर्शित झाले, त्यामुळे ऋषी कपूर व अमिताभ बच्चन या दोघांसाठीही हे वर्ष महत्त्वपूर्ण ठरले. ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन एकाच काळातील असूनही त्यांनी वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांत काम केले. ‘जंजीर’च्या यशानंतर अमिताभ बच्चन ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले, तर ऋषी कपूर यांनी रोमँटिक हिरो म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
