When Ranbir Kapoor confessed to using marijuana: ऋषी कपूर यांच्या निधनाला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. २०२० मध्ये त्यांचे निधन झाले होते. मात्र, आजही ऋषी कपूर विविध कारणांमुळे चर्चेत असतात. रणबीर कपूर, रिद्धीमा कपूर, नीतू कपूर त्यांच्या आठवणी सांगतात. याबरोबरच, त्यांच्याबरोबर काम केलेले सहकलाकार त्यांचे अनुभव सांगतात, त्यांच्या आठवणी सांगतात. आता लाईन प्रोड्युसर सुमित त्यागी यांनी एका मुलाखतीत ऋषी कपूर व रणबीर कपूर यांचा एक किस्सा सांगितला आहे.

“त्याने गांजाचे सेवन…”

सुमित त्यागी यांनी नुकतीच ‘द शिवम पॉडकास्ट’मध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी ‘दो दुनी चार’ या सिनेमाच्या शूटिंगचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “सगळ्यांनाच ऋषीजींची भीती वाटायची. त्यांना खूप समजावल्यानंतर ते मिशा लावायचे. ते वारंवार असे म्हणत असत की मी मिशा काढून टाकेन. ते अनुभवी व्यक्ती होते. ते अनेक गोष्टींबद्दल बोलत असायचे पण ते ऐकण्यात तरुणांना काही रस वाटत नसे.”

याच मुलाखतीत त्यांनी आणखी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, सेटवर एक दिवस मी ऋषीजींबरोबर संवादाचे वाचन करत होतो. त्याचवेळी टीव्हीवर त्यांच्या मुलाची रणबीर कपूरची मुलाखत सुरू होती. रणबीरने मुलाखतीत सांगितले की, त्याने गांजाचे सेवन केले होते. ते ऐकल्यानंतर ऋषी कपूर यांनी रणबीरला फोन केला आणि मला जायला सांगितले. त्यानंतर ते त्याला ओरडत होते.”

सुमित त्यागींनी नीतू कपूर यांच्या स्वभावाबद्दलही सांगितले. ते म्हणाले, “नीतूजींचा स्वभाव खूप गोड आहे. त्या सगळ्यांसाठी कुकीज घेऊन यायच्या. प्रत्येकाला नावाने हाक मारायच्या आणि सगळ्यांची काळजी घ्यायच्या, प्रत्येकाचे ऐकून घ्यायच्या.”

ऋषी कपूर यांच्या स्वभावाबद्दल ते म्हणाले, “ते खरे होते, त्यांच्या वागण्या-बोलण्यात कोणताही दिखावा नव्हता.” चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाची आठवण सांगत सुमित म्हणाले, “शूटिंगच्या शेवटच्या दिवशी मी नीतूजींबरोबर फोटो काढले. पण, ऋषी कपूर यांच्याबरोबर फोटो काढण्यास मी फार उत्सुक नव्हतो. त्यांनी मला बोलावले आणि विचारले की तुला माझ्याबरोबर फोटो काढायचा नाही का? ते खूप मोठे कलाकार होते. मी त्यांच्यासमोर काहीच बोललो नाही. पण, मला काय वाटत होते हे त्यांना समजले. तरीही माझ्याकडे त्यांच्याबरोबरचा फोटो आहे. त्या प्रकारानंतर त्यांनी मला खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, शेड्यूल लावणे आणि इतर गोष्टी कोणीही करू शकतो. पण, एका कलाकाराला कसे सांभाळायचे हे मी तुला शिकवले आहे आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. ते मला म्हणाले की, तू ऋषी कपूर यांना सांभाळलं आहेस, तू कोणत्याही कलाकाराबरोबर काम करू शकतोस.”

पुढे सुमित त्यागी म्हणाले की, ऋषी कपूर यांच्याबरोबर दिग्दर्शकही बोलत नसत, ते त्यांना घाबरत असत. अगदी ऋषी कपूर व नीतू कपूरदेखील त्यांना घाबरत असत. पण, शेवटच्या दिवशी ते जेव्हा माझ्याशी बोलले, तेव्हा त्यांच्याबद्दलचे सगळे गैरसमज दूर झाले.”

दरम्यान, ऋषी कपूर यांच्यानंतर त्यांचा मुलगा रणबीर कपूरसुद्धा विविध भूमिका आणि सिनेमांतून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत आहे.