Ashwin Kaushal on Rishi Kapoor: रणबीर कपूर लवकरच ‘रामायण’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपासून सिनेमाचा टीझर प्रदर्शित होत आहे. या टीझरमध्ये रणबीरचा लूक पाहून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या सिनेमात त्याच्याबरोबर अनेक कलाकार झळकणार आहेत.
‘रामायण’ या सिनेमाबरोबरच रणबीर कपूर लवकरच ‘लव्ह अँड वॉर’ सिनेमातदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर विकी कौशल आणि आलिया भट्टदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. हा सिनेमा जानेवारी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते अश्विन कौशल या सिनेमात रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत. त्यांनी नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी चित्रपटातील भूमिकेबद्दल, तसेच त्यांना ही भूमिका कशी मिळाली याबद्दल वक्तव्य केले.
‘लव्ह अँड वॉर’मध्ये त्यांना कशी भूमिका मिळाली याबद्दल अश्विन कौशल म्हणाले, “गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये संजय लीला भन्साळी यांना मला भेटायचे होते. फिल्म सिटीमध्ये सिनेमाचा सेट होता, तिथे मी त्यांना भेटण्यासाठी गेलो, मी त्यांना पहिल्यांदाच भेटत होतो. ते मला उत्तम पद्धतीने भेटले. त्यांनी मला सांगितले की, चित्रपटात तुमच्यासाठी जी भूमिका आहे, तिचे दोन किंवा तीन सिक्वेन्स आहेत. ती वेगळी भूमिका होती. मी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी मला फोन आला की, तुमचा अभ्यास केल्यानंतर संजय लीला भन्साळींनी वेगळा विचार केला आहे. त्याचवेळी मला सांगण्यात आले की रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली आहे.”
पुढे ते रणबीर कपूरबद्दल म्हणाले, “ऋषी कपूर माझ्यासाठी प्रेरणास्थान होते. त्यांना मी माझ्या वडिलांच्या जागी मानायचो. नशिबाने मला रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारण्याची संधी दिली. मी रणबीरला याबद्दल सांगितले. नशीब ही खूप वेगळी गोष्ट आहे. रणबीर खूप संस्कारी मुलगा आहे, त्याला त्याच्या स्टारडमचा अजिबात अहंकार नाही, तो चांगल्या पद्धतीने मला भेटला.”
२०२४ पासून ‘लव्ह अँड वॉर’ सिनेमाचे काम सुरू आहे. हा सिनेमा २०२६ ला प्रदर्शित होणार होता. Variety India मधील एका रिपोर्टनुसार, चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे, तसेच सिनेमाचे बजेट ४२५ कोटींपर्यंत वाढले आहे. सुरुवातीला सिनेमाचे शूटिंग १२० दिवसांत पूर्ण होणार होते. मात्र, नंतर शूटिंगसाठी १७५ दिवस लागले आहेत. तसेच, चित्रपटातील युद्धाच्या सीनच्या शूटिंगला जास्त वेळ लागत असल्यामुळे काही महत्त्वाचे भाग आणि तीन गाणी अजून शूट करायची बाकी असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, आता चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
