Rita Bhaduri Tragedy: जया बच्चन हे इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. त्यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केलं. लग्नापूर्वी त्या स्वतः बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होत्या आणि ‘जया भादुरी’ या नावाने ओळखल्या जायच्या. त्यांच्या या आडनावाशी एका दुसऱ्या अभिनेत्रीचंही कनेक्शन आहे. बऱ्याच जणांना वाटायचं की ती त्यांची बहीण आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात सारखं आडनाव असण्यापलीकडे त्यांचा एकमेकींशी कोणताही संबंध नव्हता. या अभिनेत्रीचं नाव रीता भादुरी. चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री व्हायचं स्वप्न उराशी बाळगून इंडस्ट्रीत आलेल्या या अभिनेत्रीचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. पण तरीही त्यांनी अनेक लहान-मोठ्या भूमिका साकारून स्वतःची ओळख निर्माण केली.

रीता भादुरी यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९५५ रोजी झाला होता. त्यांची आई चित्रपटात काम करत होती, त्यामुळे त्यांनाही अभिनयाची आवड होती. अभिनेत्री व्हायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुण्यातील नामांकित ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मधून अभिनयाचे शिक्षण घेतले. रीता यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९६८ मध्ये ‘तेरी तलाश में’ या चित्रपटातून केली. यानंतर १९७४ मध्ये ‘आईना’ चित्रपटात त्यांना राजेश खन्ना आणि मुमताज यांसारख्या मोठ्या स्टार्सबरोबर काम करण्याची संधी मिळाली. चित्रपटात त्यांची भूमिका लहान होती, तरीही त्यांच्या स्क्रीन प्रेझन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

‘जूली’च्या भूमिकेमुळे मिळाली लोकप्रियता

१९७५ मध्ये आलेला सुपरहिट चित्रपट ‘जूली’ हा त्यांच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या चित्रपटात त्यांनी मुख्य पात्राच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती आणि त्यांच्यावर चित्रित झालेलं ‘ये रातें नई पुरानी’ हे गाणंही खूप गाजलं. यानंतर त्यांनी ‘सावन को आने दो’, ‘अनुरोध’, ‘बेटा’, ‘हम आपके हैं कौन’, ‘राजा’, ‘क्या कहना’, ‘कभी हां कभी ना’ आणि ‘दिल विल प्यार व्यार’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दमदार सहाय्यक भूमिका साकारल्या.

rita-bhaduri-jaya-bachchan-sister-relationship-facts(1)
रीता भादुरी (फोटो- जनसत्ता)

सारखं आडनाव असल्यामुळे जया बच्चन यांच्याशी जोडलं गेलं नातं

जया बच्चन यांचं लग्नापूर्वीचं नाव जया भादुरी होतं. याच कारणामुळे अनेकदा लोक रीता भादुडी यांना जया बच्चन यांची बहीण आणि अमिताभ बच्चन यांची मेहुणी समजत असत. याविषयी २०१० मध्ये ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत रीता भादुडी म्हणाल्या होत्या, “जेव्हा मी जयपूरला गेले होते, तेव्हा एकाने मला विचारलं की, तुम्ही जया भादुरी यांच्या बहीण आहात का? हे ऐकून मला खूप राग आला होता. इंडस्ट्रीत येऊन मला इतकी वर्षे झाली, तरीही लोकांना अजून हे माहीत नाही की आमच्यात कोणतंही नातं नाही. लोक अनेकदा मला जयाची बहीण समजतात. पण जाऊ द्या, आता या गोष्टीने मला काही फरक पडत नाही.”

रीता भादुरी यांनी केले गुजराती चित्रपट

रीता भादुरी उत्तम अभिनेत्री होत्या. आई, बहीण किंवा कुटुंबातील एखादी समजूतदार स्त्री असो, त्या प्रत्येक भूमिका इतक्या सहजतेने करायच्या की प्रेक्षकांना त्या आपल्याच घरातील सदस्यासारख्या वाटायच्या. रीता भादुरी यांनी हिंदीबरोबरच गुजराती सिनेमातही काम केलं. १९७६ मध्ये आलेल्या ‘लाखो फुलानी’ या चित्रपटाच्या यशानंतर त्या जवळपास आठ वर्षे गुजराती चित्रपटांमधील एक लोकप्रिय अभिनेत्री राहिल्या. त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून अनेक हिट चित्रपट दिले आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

रीता भादुरी यांच्या गाजलेल्या मालिका

९० च्या दशकात टीव्ही मालिका सुरू झाल्यावर रीता यांनी या माध्यमातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’, ‘कुमकुम’, ‘अमानत’, ‘ससुराल गेंदा फूल’ आणि ‘निमकी मुखिया’ यांसारख्या मालिकांमधील त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.

रीता भादुरी यांनी केलं नाही लग्न

रीता भादुरी यांनी आपल्या करिअरमध्ये सुमारे ७० चित्रपट आणि २० हून अधिक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं. त्यांचं व्यावसायिक करिअर खूप यशस्वी राहिलं, पण वैयक्तिक आयुष्यात त्यांनी एकटे राहण्याचा निर्णय घेतला आणि कधीही लग्न केलं नाही. आयुष्याच्या शेवटच्या काळात त्या मधुमेह आणि किडनीच्या गंभीर आजाराशी झुंजत होत्या. उपचारादरम्यान १७ जुलै २०१८ रोजी वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.