रितेश-जिनिलीयासह समस्त देशमुख परिवाराचं एकमेकांशी खूप छान बॉण्डिंग आहे. देशमुख कुटुंबीयांमध्ये कोणाचाही वाढदिवस असो किंवा खास कार्यक्रम…जिनिलीया सर्वांना आवर्जुन शुभेच्छा देत असते. रितेशच्या आई वैशाली देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने या दोघांनाही सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत. जिनिलीयाने मॅचिंग साडी नेसून सासूबाईंबरोबर Twinning केल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

रितेश देशमुख फॅमिली फोटो शेअर करत लिहितो, “आई…पूर्वजन्माची पुण्याई असावी…जन्म जो तुझ्या गर्भात घेतला…जग पाहिलं नव्हतं तरी…नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!” अभिनेत्याने या सुंदर पोस्टला ‘साधीभोळी माझी आई.. सुखाची गं तू सावली’ हे गोड गाणं जोडलं आहे.

तर, जिनिलीया सासूबाईंबद्दल म्हणते, “आई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मी आयुष्यात अनेक भूमिका निभावल्या, पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक स्वतंत्र ओळख जपण्याची प्रेरणा तुम्ही मला दिलीत. त्याबद्दल तुमचे खूप आभार…माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे कदाचित मला शब्दांत सांगता येणार नाही…आणि यालाच प्रेम म्हणतात”

रितेश-जिनिलीयाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह मनोरंजन विश्वातील कलाकारांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. याशिवाय रितेशचे दोन्ही बंधू अमित देशमुख, धिरज देशमुख यांनी देखील आईसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.