Riteish Deshmukh’s Favourite Vegetable Lady Finger Bhindi : आपल्या आवडत्या सेलिब्रिटींचं डाएट कसं असतं, त्यांना जेवणात कोणते पदार्थ आवडतात. हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. अभिनेता रितेश देशमुखने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला कोणती भाजी आवडते याबाबत खुलासा केला आहे. रितेशला या भाजीचे सगळे प्रकार आवडतात, इतकंच नव्हे तर ही भाजी तो रोज खाऊ शकतो, असं त्याची पत्नी व अभिनेत्री जिनिलीयाने सांगितलं.
‘लोकशाही फ्रेंडली’ला दिलेल्या मुलाखतीत रितेशने त्याला भेंडीची भाजी खूप आवडते असं सांगितलं. खरंतर, भेंडीची भाजी म्हटलं की, अनेकजण नाक मुरडतात. पण, अभिनेत्याला या भाजीचे सगळे प्रकार आवडतात. याबद्दल रितेश देशमुख सांगतो, “लहानपणापासून मला भेंडी खूप आवडते…मी अगदी कच्ची भेंडी सुद्धा खायचो. भेंडी फ्राय, आलू भेंडी, नॉर्मल भेंडीची भाजी, मसाला भेंडी…एकंदर या भाजीचे सगळे प्रकार मला आवडतात…ती भाजीच मला खूप आवडते.”
यावर जिनिलीया म्हणते, “रितेश दरदिवशी भेंडीची भाजी खाऊ शकतो. आमचं जेव्हा लग्न झालं, तेव्हा मी प्रत्येक दिवशी याला विचारायचे की, आज जेवायला काय बनवू? तर हा मला रोज सांगायचा भेंडी, परत दुसऱ्या दिवशी विचाल्यावर म्हणायचा…भेंडी, तिसऱ्या दिवशीही भेंडीच! माझं असं झालं…अरे हा तर दररोज ही भाजी खाऊ शकतो.”
रितेशला भेंडीचा कोणता प्रकार बनवता येतो याबाबत विचारलं असता तो म्हणाला, “काय आहे ना…जर एखादा पदार्थ दुसरा कुणी चांगला बनवत असेल तर, आपण प्रयत्न का करावा!” रितेशचं हे उत्तर ऐकून एकच हशा पिकला.
दरम्यान, रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा गेल्याच आठवड्यात टीव्हीवर प्रसारित केला गेला. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केल्याचं पाहायला मिळालं. ‘राजा शिवाजी’ हा मराठीत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
