Genelia & Riteish Deshmukh Video : जिनिलीया व रितेश देशमुख यांची जोडी मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या दोघांचे इन्स्टाग्राम रील्स व्हिडीओ सुद्धा चाहत्यांमध्ये तेवढेच लोकप्रिय आहेत. रितेश-जिनिलीयाने आजवर अनेक मुलाखतींमध्ये सांगितलंय की, ते एकमेकांचे जोडीदार आहेतच पण, त्याआधी ते एकमेकांचे खूप छान मित्र आहे. त्यामुळे अनेकदा रितेश रील्स व्हिडीओमध्ये जिनिलीयाची चेष्टा करताना दिसतो. त्यांचा असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे.
दहीहंडीनिमित्त आज जिनिलीया व रितेश खास पारंपरिक लूकमध्ये तयार झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. जिनिलीया.. लाल रंगाचा डिझायनर ड्रेस, त्यावर मोठे कानातले, चंद्रकोर या लूकमध्ये खूपच सुंदर दिसतेय. तर, रितेशने बेबी पिंक रंगाचा कुर्ता घातल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये जिनिलीया रितेशला अगदी सिरिअस होऊन विचारते, “तू आजच्या तरुण पिढीला काय सल्ला देशील?” यावर रितेश म्हणतो, ‘Don’t Come’! अभिनेत्याने फक्त दोन शब्दांत दिलेलं हे उत्तर सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रितेश-जिनिलीयाने रिल्स ऑडिओ डबमध्ये बनवला आहे. Titus Lim याचा हा मूळ ऑडिओ आहे.
हृता दुर्गुळे, मोनालिसा यांच्यासह अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “मजेशीर व्हिडीओ आहे आणि हेच वास्तव आहे”, “दादा अगदी बरोबर बोललात”, “Couldn’t agree more”, “मजेशीर व्हिडीओ आहे पण खरं आहे”, “Don’t Come… खरंच भन्नाट व्हिडीओ आहे”, “बेस्ट कपल” अशा असंख्य प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत. रितेश जिनिलीयाच्या या व्हिडीओला अवघ्या काही तासांत जवळपास ५० लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, जिनिलीया लवकरच ‘Gunmaaster G9’ या सिनेमात झळकणार आहे. हा चित्रपट येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरिस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय रितेश-जिनिलीया दोघंही १ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक ‘राजा शिवाजी’ सिनेमात झळकले होते. या सिनेमाचं दिग्दर्शन रितेशने केलं असून, जिनिलीयाने या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली होती. या ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या रियान व राहील या दोन्ही मुलांनी सिनेविश्वात पदार्पण केलं आहे.
