Genelia Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया डिसुझा ही सिनेविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. त्यांचं एकमेकांवरील प्रेम कायम चर्चेत असतं. इतकंच नाही तर, ते एकमेकांचा खूप आदर करतात. त्यामुळे चाहते त्यांच्यावर कायम कौतुकाचा वर्षाव करत असतात. अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दोघे एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना आणि मनमोकळेपणाने बोलताना दिसतात. जवळपास दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये लग्न केलं. आता रितेश देशमुखने जोडीदार कसा असावा, याबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे.

‘बॉम्बे टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रितेश आणि जिनिलीया यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून मुलांच्या संगोपनापर्यंत अनेक विषयांवर मतं मांडली. तसेच डेटिंग, लग्न, पालकत्व आणि नाती याबद्दलचे अनुभवही शेअर केले. मुलांवर संस्कार करताना घरात काही ठराविक नियम पाळले जातात, असं सांगत एखाद्या व्यक्तीचा आदर राखणं हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट असल्याचं जिनिलीयाने नमूद केलं. तसेच, आदराच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जात नसल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे.

रितेश – जिनिलीया कसं करतात मुलांचं संगोपन

जिनिलीया म्हणाली, “माझ्या आणि रितेशमध्ये कधीतरी मतभेदसुद्धा असतात, आमची मतं वेगळी असू शकतात. पण, ते आम्ही कधीच मुलांसमोर दाखवत नाही. मुलांसमोर आम्ही नेहमी एकाच टीममध्ये आहोत असं दाखवतो. असं कधीच होत नाही की मी मुलांना काहीतरी शिकवत आहे आणि तेव्हाच रितेश मागून मुलांना, ‘ये इकडे माझ्याकडे मी चॉकलेट देतो,’ असं कधीच म्हणत नाही.”

पुढे रितेशने जोडीदाराबाबत मत व्यक्त केलं. रितेश म्हणाला, “जेव्हा लोक मला विचारतात की कोणत्या प्रकारचा जोडीदार शोधावा, यावर मी त्यांना एकच उत्तर देतो. तुम्ही अशा व्यक्तीबरोबर राहा जी तुम्हाला मनसोक्त हसवेल. मला असं वाटतं आयुष्यामध्ये तुम्हाला याच एका गोष्टीची गरज असते.” यावर जिनिलीयानेदेखील रितेशच्या मताला सहमती दाखवली.

पुढे जिनिलीया म्हणाली, “आम्ही हे मुलांबरोबरसुद्धा करतो. रितेश, मी आणि आमची मुलं जोरजोरात हसत असतो. याचं कारण म्हणजे, आयुष्य आधीच खूप स्ट्रेसफुल आहे. त्यामुळे ते हसत खेळत घालवलं पाहिजे, असं आम्हाला वाटतं,”

रितेश व जिनिलीयाची लव्हस्टोरी

रितेश व जिनिलीयाची पहिली भेट २००२ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यानंतर जवळपास दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली. रितेश-जिनिलीया यांना रियान आणि राहिल अशी दोन मुलं आहेत. दोघांनीही ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.