रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख अभिनयासह निर्माते, दिग्दर्शक अशा भूमिकाही निभावत आहेत. गेल्या जवळपास २० वर्षांच्या संसारत त्यांनी व्यावसायिक आयुष्यातही एकत्र काम करत प्रगती केली. यादरम्यान त्यांनी तब्बल सात चित्रपटांची निर्मिती केली. अलीकडेच त्यांची निर्मिती असलेला ‘राजा शिवाजी’ चित्रपट रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु, निर्मिती करणं हे अभिनयापेक्षाही अधिक कठीण काम आहे असं अनेक कलाकार स्वत: बोलताना दिसतात. अशातच रितेशने याबद्दल भाष्य करत त्याचा अनुभव सांगितला आहे.
अलीकडच्या काही वर्षांत कलाकारांच्या वाढत्या मागण्यांबद्दल निर्मात्यांनी सार्वजनिकपणे भाष्य केलं आहे. याच मुद्द्यावर रितेशने स्क्रीनशी संवाद साधताना भाष्य केलं आहे. ‘राजा शिवाजी’मध्ये संजय दत्त, सलमान खान, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर आणि बोमन इराणी यांसारखे अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. त्यामुळे या कलाकारांच्या एंटुराजचा (कलाकारांबरोबर असणाऱ्या त्यांच्या मॅनेजर, मेकअप आर्टिस्टचा खर्च) किती खर्च रितेश-जिनिलीयाने उचलला, तसेच हा पैसा चित्रपटाच्या निर्मितीतच गुंतवायला हवा होता, असा विचार त्यांच्या मनात कधी आला का, याबाबत विचारल्यानंतर त्यांनी त्यांचा अनुभव सांगत उत्तर दिलं आहे.
रितेशने सांगितला निर्मितीचा अनुभव
या प्रश्नाचं उत्तर देताना रितेश देशमुख म्हणाला, “मला वाटतं प्रत्येक चित्रपटाचं गणित वेगळं असतं. एखाद्या विशिष्ट कलाकाराचा विचार करत असताना, त्या कलाकाराबरोबर कोणता स्टाफ किंवा टीम असणार आहे, याची तुम्हाला आधीच पूर्ण कल्पना असते. त्या सर्व खर्चाचा विचार केल्यानंतरही जर सगळं तुमच्या बजेटमध्ये बसत असेल, तरच तुम्ही त्या कलाकाराशी संपर्क साधता.”
तो पुढे म्हणाला, “शेवटी, निर्मितीच्या पातळीवर बोलायचं झालं तर आमची मुंबई फिल्म कंपनी असो किंवा आम्ही ज्या कलाकारांबरोबर काम केलं ते असो, आमचा त्यांच्याबरोबर खूप चांगला अनुभव राहिला आहे. कलाकारांबरोबर काम करताना त्यांच्या टीममधील इतर स्टाफसोबतही आमचे चांगले संबंध आहेत. कारण आम्ही यापैकी बहुतांश लोकांबरोबर कलाकार म्हणून काम केलं आहे. अभिषेकच्या मेकअप दादापासून ते त्याच्या ड्रायव्हरपर्यंत, तसेच संजू सरांच्या असिस्टंटपासून बोमन यांच्या टीमपर्यंत अनेकांना आम्ही ओळखतो. त्यामुळे आमच्यात चांगले संबंध आहेत. आम्हाला कधीही कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागला नाही.”
जिनिलीयाने सांगितला निर्मिती करतानाचा अनुभव
पुढे जिनिलीयानेही याबद्दलचा तिचा अनुभव सांगत मत व्यक्त केलं. ती म्हणाली, “जर एखाद्या कलाकाराच्या टीमचा (एंटुराजचा) खर्च तुमच्या बजेटमध्ये बसत नसेल, तर निर्माता म्हणून तो खर्च परवडत नसल्याचं सांगून नकार देण्याचा निर्णय तुमचा आहे. तो खर्च परवडत नसेल, तर त्यावर चर्चा होऊ शकते. माझ्या मते, यासाठी दोन्ही बाजूंनी जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे.”
“इंडस्ट्री हे खूप सुंदर ठिकाण आहे. अनेकदा या इंडस्ट्रीवर टीका केली जाते आणि नकारात्मक बोललं जातं, पण इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणेच इथेही चांगली आणि काही फारशी चांगली नसलेली माणसं आहेत. मात्र एकूणच ही खूप चांगली इंडस्ट्री आहे. राजा शिवाजीमध्ये सहभागी झालेला प्रत्येक जण मनापासून या चित्रपटासाठी काम करण्यासाठी आला होता.” असं जिनिलीयाने पुढे सांगितलं.
