scorecardresearch

“प्रेमात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट…” नातं टिकवण्यासाठी रितेश देशमुखचा मोलाचा सल्ला

नुकतंच या दोघांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून २० वर्षं पूर्ण झाली

“प्रेमात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट…” नातं टिकवण्यासाठी रितेश देशमुखचा मोलाचा सल्ला
फोटो : सोशल मीडिया

सध्या रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांची जोडी चांगलीच गाजतीये. नुकताच या दोघांचा ‘वेड’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. रितेश देशमुखने या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. शिवाय जिनिलीया देशमुखचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही तूफान कमाई करत आहे.

केवळ महाराष्ट्र आणि भारतच नव्हे तर परदेशातील लोकांनाही या चित्रपटाने अक्षरशः ‘वेड’ लावलं आहे. नुकतंच या दोघांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून २० वर्षं पूर्ण झाली. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून दोघांनी या मनोरंजनविश्वात पदार्पण केलं होतं. या २० वर्षपूर्तीनिमित्तच्या एका कार्यक्रमात दोघांनी चाहत्यांशी आणि पत्रकारांशी भरपूर गप्पा मारल्या.

आणखी वाचा : “सगळ्या मुलींनी…” उर्फी जावेदबद्दल हनी सिंगचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

यादरम्यान रितेश आणि जिनिलीया या दोघांनी त्यांच्या नात्यामागचं सीक्रेट शेअर केलं. प्रेम आणि आदर यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती हे उलगडून सांगताना रितेश म्हणाला, “प्रेमात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे रीस्पेक्ट म्हणजेच आदर, तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करता पण तो तुम्हाला योग्य तो सन्मान देत नसेल तर ते फार चुकीच आहे. कमी प्रेम भरपूर आदर हे एकवेळ चालेल, पण भरपूर प्रेम आणि कमी आदर यामुळे कधीही कोणतंही नातं टिकू शकत नाही.”

चित्रपटगृहातही ‘वेड’ चांगलीच कामगिरी करणार असा सगळ्यांचा विश्वास होता आणि तो सार्थ ठरला आहे. या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. याबरोबरच अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 18:54 IST

संबंधित बातम्या