Riteish Deshmukh on paparazzo gesture: अभिनेता रितेश देशमुख हा विविध कारणांमुळे चर्चेत असतो. अनेकदा तो त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत असतो. तो त्याच्या नवनवीन भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. याबरोबरच तो विविध रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन करतो. काही दिवसांपूर्वीच रितेश ‘लॉक अप २’ या रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन करताना दिसला.
रितेश देशमुख नेमकं काय म्हणाला?
याबरोबरच, रितेश देशमुखचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वीच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. पापाराझींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. रितेश एका रेस्टॉरंटमधून बाहेर आला, त्यानंतर त्याला एका मुलाला मदत करायची होती, पण त्याच्याकडे रोख रक्कम नव्हती. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका पापाराझीने त्याला मदत केली होती. त्यानंतर रितेशने त्या पापाराझीचा सोशल मीडियावर फोटो शेअर केला होता. आता अभिनेत्याने एका मुलाखतीत पुन्हा एकदा त्या प्रसंगाबद्दल वक्तव्य केले आहे. तो नेमकं काय म्हणाला आहे, याबद्दल जाणून घेऊ…
रितेश म्हणाला, “आम्ही जात होतो, तिथे एक मुलगा १०० रुपयाला काहीतरी विकत होता. माझ्याकडे त्या दिवशी रोख रक्कम नव्हती. सध्या मी माझ्याजवळ रोख रक्कम ठेवत नाही, कारण सगळ्या गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. मी आधी माझ्या ड्रायव्हरला विचारले की तुझ्याकडे १०० रुपये सुट्टे आहेत का? त्याच्याकडे १०० रुपये सुट्टे नव्हते. मग मी त्या लहान मुलाला विचारले की तुझ्याकडे जीपे आहे का? कारण, जे वस्तू विकतात, त्यांच्याकडे QR कोड वगैरे असतो. तर तो मुलगा मला म्हणाला की माझ्याकडे जी पे नाही. त्यावेळी मला एका पापाराझीने मदत केली. तो मला म्हणाला की मी पैसे देतो. त्यावेळी मी त्याला ओळखतही नव्हतो, त्याचे नाव माहीतही नव्हते. आता माहीत आहे. जर मी चुकत नसेन तर त्याचे नाव सुशील मोहिते असे आहे आणि जर नाव चुकले असेल तर मला माफ करा. मला त्याचे पैसे जीपेवरून परत करायचे होते, पण गर्दी झाली आणि लोक गाड्यांचे हॉर्न वाजवत होते. त्याने नका देऊ असे सांगितले. गोंधळ होत असल्याने मी निघालो. पण, गाडीत बसण्याआधी मी त्याचा फोटो काढला.”
रितेश असेही म्हणाला, “मला त्याचे पैसे परत करायचे होते. मी त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले की मी त्याचे देणं लागतो. मला त्याचे पैसे परत करायचे आहेत आणि मला त्याचा नंबर हवा आहे. शेवटी मला त्याचा नंबर मिळाला आणि तो नको म्हणत असताना मी त्याला पैसे परत केले.”
रितेश या प्रसंगाबद्दल असेही म्हणाला की, १०० रुपयांपेक्षाही त्याने दाखवलेली माणुसकी महत्त्वाची होती. तो म्हणाला, “त्या पापाराझीने दाखवलेली माणुसकी महत्त्वाची होती. त्याने माझ्यासाठी पैसे देण्याची तयारी दर्शवली. रस्त्यावर ये-जा करताना नेहमीच गोंधळ असतो आणि पापाराझी त्यांचं काम करत असतात. आपल्याला नेहमी वाटतं की त्यांना कदाचित आपले फोटो हवे असतील आणि त्यांना मदतीची गरज असेल. पण, आपल्या हे लक्षातच येत नाही की असेही क्षण येतात जेव्हा ते मदतीसाठी पुढे येतात. आम्हाला कायमच पापाराझींचा पाठिंबा मिळाला आहे.”
शेवटी हसत रितेश असेही म्हणाला, “लोक म्हणतात की तुम्ही पापाराझींना पैसे देता. पण, मी असा एकमेव आहे ज्याला पापाराझींकडून पैसे मिळाले आहेत.”
