Riteish Deshmukh Shared A Post : रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं आहे. त्यांना मराठी प्रेक्षक महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणूनही ओळखतात. त्यांच्या केमिस्ट्रीचे अनेक चाहते आहेत. अनेक जण त्यांना कपल गोल्स, असंही म्हणतात. अशातच आता रितेशनं त्याच्या बायकोसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
रितेश देशमुख व जिनिलीया अनेकदा त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकतात. रितेश अनेकदा जिनिलीयाची काळजी घेताना आणि तिच्यावर प्रेम करताना दिसतो. त्यामुळे त्याला सर्व जण ग्रीन फॉरेस्टही म्हणतात. अशातच आता रितेशनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याला त्यानं छान कॅप्शनही दिली आहे.
रितेश देशमुख काय म्हणाला?
रितेशनं जिनिलीयाबरोबरचे जुने फोटो शेअर केले आहेत. त्यानं या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमधून म्हटलंय, “बरोबर २४ वर्षांपूर्वी आपण एकमेकांना भेटलो आणि पसंत केलं होतं. त्यानंतर आपण कधीच एकमेकांची साथ सोडली नाही. तू माझी सुरक्षित जागा, माझं गोड स्वप्न आहेस. दररोज माझी निवड करण्यासाठी धन्यवाद. माझी मैत्रीण, माझी प्रेयसी, माझी बायको मी तुझ्या प्रेमात आकंठ बुडालो आहे.”
रितेशनं यावेळी जिनिलीयाबरोबरचे दोन जुने आणि रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. रितेशच्या या पोस्टखाली बॉबी देओल, अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, अनुपण खेर, स्वप्नील जोशी, भाग्यश्री या कलाकार मंडळींनी कमेंट्स करत त्यांचं कौतुक केलं आहे.
रितेश व जिनिलीया हे दोघे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि एकमेकांबरोबर मजेशीर रील्सही बनवत असतात. अनेकदा दोघे एकमेकांबरोबरचे फोटो व व्हिडीओही शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वीच रितेश-जिनिलीयाच्या लग्नाला १४ वर्षं पूर्ण झाली आहेत. तर, या दोघांना भेटून २४ वर्षे पूर्ण झालीयेत. दोघे त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर भेटल्यानंतर प्रेमात पडले आणि पुढे बरीच वर्षं एकमेकांना त्यांनी डेट केलं. त्यांनतर या दोघांनी लग्न केलं.

