Riteish Deshmukh Viral Video : जिनिलीया व रितेश देशमुख यांच्याकडे कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं. रितेश व जिनिलीया यांना रियान व राहील अशी दोन मुलं आहेत. २५ नोव्हेंबरला त्यांचा मोठा मुलगा रियान ११ वर्षांचा झाला. लेकाच्या ११ व्या वाढदिवसानिमित्त रितेश-जिनिलीयाने खास पार्टीचं आयोजन केलं होतं. रियानच्या बर्थडे पार्टीला देशमुख कुटुंबीय, जवळचे मित्रमंडळी आणि काही सेलिब्रिटींची मुलंही उपस्थित होती. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ नेमका काय आहे पाहुयात…
रितेश-जिनिलीयाने लेकाच्या वाढदिवसानिमित्त खास कॅज्युअल लूक केला होता. दोघांनी एकत्र रेड कार्पेटवर पोझ देऊन पापाराझींना अभिवादन केलं. यानंतर रितेश आपल्या दोन्ही मुलांसह रेड कार्पेटवर आला, त्यांच्यासह धीरज देशमुखांची मुलं देखील उपस्थित होती. यावेळी फोटो काढून झाल्यावर रितेशच्या लाडक्या लेकाने त्याला शूजची लेस निघालीये असा इशारा केला. यानंतर अभिनेत्याने जे काही केलं त्या कृतीचं सध्या सोशल मीडियावर भरभरून कौतुक करण्यात येत आहे.
रेड कार्पेटवर फोटो काढल्यावर रियानने आपल्या बाबाला शूजची लेस निघालीये असं सांगितलं. यानंतर रितेश कसलाही विचार न करता खाली बसला आणि त्याने लेकाच्या शूजची लेस बांधली. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. रितेश व जिनिलीया कायम आपल्या मुलांची काळजी घेताना दिसतात, याशिवाय राहील-रियानच्या संस्कारांचं देखील सोशल मीडियावर कायम कौतुक केलं जातं. आता या बापलेकाचा नवीन व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून त्यांच्या बॉण्डिंगचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे.
रियानला ११ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रितेश व जिनिलीया या दोघांनीही खास पोस्ट शेअर केल्या होत्या. रितेश देशमुखने रियानला त्याच्या वाढदिवसानिमित्त पत्र लिहित खास वचन दिलं. “तुझ्या प्रत्येक मॅचेसमध्ये ( फुटबॉल ) मी तुला सर्वात जास्त चिअर करेन, तुझ्या प्रत्येक गोष्टी शांतपणे ऐकून घेईन, जोपर्यंत तुला माझी गरज आहे तोपर्यंत हा बाबा कायम तुझा हात धरून राहील” असं अभिनेत्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता गेल्या काही महिन्यांपासून ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट पुढच्यावर्षी मे महिन्यात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
