Riteish Deshmukh And Vicky Kaushal : रितेश देशमुख सध्या ‘राजा शिवाजी’ सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच त्याने विकी कौशलची भेट घेतली. कारण, गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ या ऐतिहासिक सिनेमात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या दोघांनीही एकत्र भेटून दोन्ही सिनेमांविषयी चर्चा केली, एकमेकांबरोबर अनेक अनुभव देखील शेअर केले.

यावेळी रितेशने विकीला एक खास किस्सा सांगितला. ही गोष्ट ऐकताच विकी सुद्धा भारावून गेला होता. रितेश शिवजयंतीला शिवनेरीवर गेला असताना त्याने गडावरची माती आपल्या घरी आणली आणि ती देव्हाऱ्यात ठेवली. रितेश नेमकं काय म्हणालाय जाणून घेऊयात…

रितेश देशमुख म्हणाला, “आपल्या महाराजांवर आधारित आणखी सिनेमे बनवले गेले पाहिजेत. कारण, या माध्यमातून आजच्या तरुण पिढीपर्यंत आपला इतिहास पोहोचण्यास मदत होईल. यासह प्रत्येक दिग्दर्शकाचे पैलू, विचार हे वेगळे असतात. मी शिवजयंतीला शिवनेरी गडावर गेलो होतो…सकाळचे ६ वाजले होते. आमच्या चित्रपटात सुद्धा शिवजन्माचा सीन आहे. आमचं शूटिंग पूर्ण झालं होतं आणि मी शिवजयंतीला गडावर त्या खोलीत असाच बसून होतो. तेव्हा तिथे वाऱ्याची झुळूक आली…त्याक्षणाला मला जाणवलं, ही तिच हवा आहे, ज्या हवेने एकेकाळी माझ्या महाराजांच्या पायाला स्पर्श केला असेल. ही भावना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. या २३-२४ वर्षांत मी अनेक सिनेमांमध्ये काम केलंय..पण, ही भावना याच चित्रपटादरम्यान जाणवली.”

विकी कौशल यावर म्हणाला, “रितेश तुम्ही जे सांगताय…ती भावना नेमकी काय आहे हे मी खरंच समजू शकतो. कारण, मी सुद्धा ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर रायगडावर गेलो होतो. तेव्हा सुद्धा माझ्या मनात अशाच अनेक भावना दाटून आल्या होत्या.”

शिवनेरी गडावरची माती घरी आणली…

रितेश पुढे म्हणाला, “मी शिवनेरी गडावरची माती घरी घेऊन आलोय. ती माती मी माझ्या घरच्या देव्हाऱ्यात ठेवलीये. कारण, तिथे माझ्या महाराजांचा जन्म झाला होता.”

“बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांना कसं यश मिळतं हे आपल्यासाठी महत्त्वाचं नसतं. तर, हे सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, आपण या चित्रपटाचा एक भाग आहोत हीच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. हा चित्रपट म्हणजे एक पुष्प आहे, जे आपण महाराजांना अभिवादन करून अर्पण करतोय हीच भावना प्रत्येकाच्या मनात असते.” अशा भावना यावेळी रितेश आणि विकी कौशल या दोघांनीही चर्चा करताना व्यक्त केल्या.