Riteish Deshmukh and Genelia D’Souza: चित्रपटसृष्टीतील काही जोडपी ही लोकप्रिय ठरतात. त्यांची खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री, एकमेकांप्रतिचा आदर सर्वांची मने जिंकून घेतो. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतात.

रितेश देशमुख आणि जिनिलीया डिसूजा हे अशा लोकप्रिय सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहे. त्यांना चाहते दादा-वहिनी म्हणून ओळखतात. ते विविध कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावतात.त्यावेळी ते लक्ष वेधून घेतात.

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी एकाच चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. २००३ ला प्रदर्शित झालेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले. या चित्रपटातील त्यांच्या कामाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते. ३ फेब्रुवारी २०१२ ला त्यांनी लग्नगाठ बांधली.

“हा वनवास कधीच…”

आज ३ फेब्रुवारी २०२६ ला त्यांच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने रितेश देशमुखने त्यांची एक रील शेअर केली आहे. त्यामध्ये हा व्हिडीओ शेअर करताना रितेशने लिहिले, “लग्नाला १४ वर्षे झाली. हा वनवास कधीच संपू नये.” पुढे त्याने जिनिलीयाच्या अकाउंटला टॅग करत लिहिले, “बायको, हॅपी अॅनिव्हर्सरी.”

रितेशच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “हॅपी अॅनिव्हर्सरी दादा वहिनी”, दुसऱ्याने लिहिले, “काय राव, इतकी सुंदर बायको आहे, त्यात वनवास कसला?”, आणखी एकाने लिहिसे, “दादा यावेळी वाचला बरं का.”

जिनिलीयाने शेअर केले फोटो

तर जिनिलीयाने इन्स्टाग्रावर त्यांच्या लग्नातील सुंदर फोटो शेअर केले आहेत. ते फेरे घेत असतानाचा एक फोटो पाहायला मिळत आहे. तर रितेश जिनिलीयाच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असल्याचेदेखील एका फोटो पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच, त्यांच्या लग्नातील हळदीच्या कार्यक्रमातील काही फोटो पाहायला मिळत आहेत. मेहंदी, बांगड्या असे विविध फोटोदेखील पाहायला मिळत आहेत. या फोटोंमधून त्याच्या खास क्षणांची झलक चाहत्यांना पाहायला मिळत आहेत.

हे फोटो शेअर करताना जिनिलीयाने लिहिले, “आय लव्ह यू पार्टनर. आज, उद्या आणि कायमच माझे तुझ्यावर प्रेम असेल. आयुष्याच्या या सुंदर गोष्टीतील तू माझा कायमच आवडता धडा आहेस.” पुढे तिने रितेशच्या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करत त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

जिनिलीयाच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी आणि रितेशदादा”, दुसऱ्या एकाने लिहिले, “सगळ्या महाराष्ट्राचे दादा-वहिनी”, आणखी एकाने लिहिले, “तुम्ही दोघे एकत्र खूप छान आहात.” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी रितेश आणि जिनिलीयाला शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, रितेश आणि जिनिलीयाने वेड या चित्रपटातही एकत्र काम केले आहे. रितेश अभिनयाबरोबरच दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनदेखील काम करत आहे. सध्या रितेश बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचे सूत्रसंचालन करत आहे. त्याच्या सूत्रसंचालनाचे कौतुक होताना दिसत आहे.