ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी मोठ्या पडद्यावर अनेकदा त्यांच्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्या अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांसारख्या त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्यांच्या आईच्या भूमिकेत झळकल्या. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रोहिणी यांनी धर्मेंद्र यांना त्या त्यांच्या आईची भूमिका साकारण्यासाठी खूपच तरुण वाटत होत्या असं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनी रोहिणी यांना अधिक मेकअप करण्यास म्हटल्याचा किस्सा आता त्यांनी सांगितला आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मोठ्या वयाच्या स्त्रियांच्या भूमिका साकारण्याबद्दल रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, “मला याचा कधीच त्रास झाला नाही. कारण मी एखादी भूमिका साकारते, तेव्हा माझ्यासाठी ती केवळ एक व्यक्तिरेखा असते. ती भूमिका मोठ्या वयाच्या महिलेची आहे की लहान वयाच्या, याचा मी कधीच विचार करत नाही. मी नेहमीच व्यक्तिरेखेच्या गरजेनुसार अभिनय करते.” ‘हमसे ना टकराना’च्या सेटवर धर्मेंद्र यांच्याबरोबर झालेली पहिली भेट त्यांना आजही आठवते. चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्या उटीमध्ये गेल्या होत्या. पहिल्याच दिवशी धर्मेंद्र यांची भेट घेण्यासाठी त्या गेल्या. त्यानंतर त्या आपल्या खुर्चीवर बसताच त्यांच्या मेकअप आर्टिस्टने त्यांच्याकडे एक अनपेक्षित विनंती केली.
रोहिणी हट्टंगडींनी सांगितला किस्सा
हा किस्सा सांगताना रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, “माझा मेकअप आर्टिस्ट आला आणि त्याने माझा बराच वेळ मेकअप करण्यात घालवला. मी त्याला विचारलं की, तू नेमकं काय करतोयस? आपला मेकअप अजून का पूर्ण झालेला नाही? त्यावर तो थोडासा घाबरत म्हणाला की, धरमजींनी मला जास्त मेकअप करायला सांगितलं आहे. कारण त्यांना मी खूप तरुण वाटत होते. मला प्रश्न पडला की, आता मी किती मेकअप करू आणि केसांमध्ये किती पांढरे केस दाखवू? मी तरुण आहे, त्यात माझी काय चूक?” हा किस्सा सांगताना रोहिणी हट्टंगडी हसल्या.
दीपक बहरी दिग्दर्शित ‘हमसे ना टकराना’ हा १९९० मध्ये प्रदर्शित झालेला अॅक्शन चित्रपट होता. या चित्रपटात धर्मेंद्र, जितेंद्र, अनिता राज आणि अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. रोहिणी हट्टंगडी यांनी या चित्रपटात धर्मेंद्र यांच्या आईची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे, १९५१ मध्ये जन्मलेल्या रोहिणी या चित्रपटाच्या वेळी अवघ्या ३९ वर्षांच्या होत्या, तर धर्मेंद्र यांचं वय ५५ वर्षे होतं.
