Rohini Hattangadi Shares Diet Plan : रोहिणी हट्टंगडी अभिनय क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. ७५ व्या वर्षीसुद्धा त्या त्यांची आवड जपत असून आजही त्या अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी आजवर हिंदी, मराठी, तामिळ, कानडी, मल्याळी आणि गुजराती चित्रपटांत, नाटकांत काम केलं आहे. त्यांनी टेलिव्हिजनमध्येही काम केलं आहे.

रोहिणी हट्टंगडी यांनी नुकतीच ‘फ्री प्रेस जरनल’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या आहाराबद्दल सांगितलं आहे. त्यांनी यादरम्यान ज्येष्ठ व्यक्तीने आरोग्याची कशी काळजी घ्यावी आणि त्यांचा आहार कसा आहे याबद्दल सांगितलं आहे. वयाच्या ७५ व्या वर्षीसुद्धा त्या त्यांच्या प्रकृतीची काळजी कशी घेतात याबद्दल त्यांनी सांगितलं आहे.

रोहिणी हट्टंगडी याबद्दल म्हणाल्या, “मी डायबेटिक पेशंट आहे, त्यामुळे मला खूप काळजी घ्यावी लागतेय. शूटिंग करताना त्याचे वेळापत्रक आणि इतर कामं या सगळ्यांचा समतोल साधून दररोज व्यायाम करणं, आहार नीट घेणं खूप कठीण असतं.” रोहिणी हट्ट्ंगडी यांनी सांगितलं की, “खूप साऱ्या स्त्रिया विशेष करून गृहिणी त्यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. त्यांना असं वाटतं की त्यांची जबाबदारी इतर कोणीही घेणार नाही. ज्या स्त्रियांचं वय ५० हून अधिक आहे, त्यांनी डॉक्टरकडे जाऊन हेल्थ चेकअप केला पाहिजे. कारण या वयात जर कुठला त्रास असेल तर तो वाढायला वेळ लागत नाही.”

Award Banner

रोहिणी हट्टंगडी यांची आहाराबद्दल प्रतिक्रिया

रोहिणी हट्टंगडी पुढे त्यांच्या आहाराबद्दल म्हणाल्या, “मी नेहमी शूटिंगसाठी सेटवर जाताना माझा डब्बा घेऊन जाते. मला खिचडी खायला आवडते आणि तेलकट जेवण मी खात नाही. सहकलाकारांबरोबर जेवायला मजा येते, पण तरी मी माझ्या शरीरासाठी जे योग्य आहे तेच खाते. जर कोणाला पिझ्झा खायचा असेल, त्याचे होणारे परिणाम माहीत असतानाही; तर मग ते खाल्ल्यानतंर त्रास झाला तर त्याची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे.”

रोहिणी पुढे म्हणाल्या, “व्यायाम करणं चांगली गोष्ट आहे, पण हल्लीची मुलं तासनतास व्यायाम करतात. फक्त जॉन अब्राहमसारखं दिसायचं आहे म्हणून व्यायाम करणं योग्य नाही, तुम्हाला तुमच्या शरीराची गरज लक्षात घ्यायला हवी आणि त्यानुसार काम करायला हवं.” पुढे त्यांनी लोक स्कीनकेअर प्रॉडक्टचाही खूप वापर करतात असं सांगितलं आहे.

रोहिणी म्हणाल्या, “तुम्हाला प्रत्येकवेळी मेकअप करण्याची गरज नाही. तुमच्या त्वचेला थोडा आराम करू द्या. जेव्हा गरज असेल तेव्हाच मेकअप करा. मला स्वतःला मेकअप करायला आवडत नाही, पण कामासाठी मी करते, तोही खूप थोडा मेकअप करते.” रोहिणी पुढे म्हणाल्या, “मेकअप काढण्यासाठी मी नारळाचं तेल वापरते, केमिकल प्रॉडक्टचा वापर करत नाही.”