Golmaal 5 iconic racing car scene recreate : रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेला ‘गोलमाल : फन अनलिमिटेड’ चित्रपट जवळपास सर्वांनीच पाहिला आहे. २००६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. या चित्रपटातील कॉमेडी सीन्स आणि आयकॉन डायलॉग्ज आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यातील कार रेसिंगमधील सीन रोहित शेट्टीने पुन्हा जिवंत करीत गोलमाल ५ ची घोषणा केली आहे.
‘गोलमाल’मध्ये अजय देवगण, अर्शद वारसी, तुषार कपूर व शर्मन जोशी यांच्या चौकडीने चित्रपटात जबरदस्त धमाल उडवून दिली होती. त्यांच्या भन्नाट टायमिंग आणि विनोदी अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला.
त्यातील वसुली भाई, पिवळी बुलेट, कार रेसिंग असे अनेक सीन्स अजरामर ठरले आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टीने त्यासंबंधीचा खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये गोलमाल या चित्रपटातील २००६ मधील कार रेसिंगचा जुना सीन आणि २०२६ मधील नवीन सीन एकत्रित करीत करण्यात आला आहे. त्यामुळे पाहताच क्षणी प्रेक्षकांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
रोहित शेट्टीची खास सोशल मीडिया पोस्ट
या व्हिडीओमध्ये अर्शदची भूमिका असलेला माधव आणि शर्मनची भूमिका असलेला लक्ष्मण यांचा कार रेसिंगमधील सीन दाखविण्यात आला आहे. त्यामध्ये माधव गाडी चालवताना आणि लक्ष्मण स्त्रीच्या वेशामध्ये शेजारी बसलेला आयकॉनिक सीन नव्या रूपामध्ये दाखविण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करताना ‘गोलमाल’चा दिग्दर्शक रोहित शेट्टीने लिहिले की, आठवणींच्या जगात फेरफटका मारताना…! तुम्ही जेव्हा ‘गोलमाल’चा पहिला भाग पाहिला, तेव्हा तुमचे वय किती होते? मी तुम्हाला वचन देतो की, आनंदाचे ते दिवस तुम्ही लवकरच पुन्हा अनुभवू शकाल… चित्रीकरण सुरू आहे, अशी कॅप्शन त्याने दिली आहे.
गोलमाल ५ ची घोषणा
या पोस्टसह रोहित शेट्टीने ‘गोलमाल ५’ची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नेटकऱ्यांच्या कमेंट्समध्ये एकाने लिहिलेय की, लवकर सिनेमा घेऊन या, उद्या सकाळी पनवेलला जायचं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलेय की, मी आतुरतेनं वाट पाहतो आहे.
अर्शद वारसी आणि शर्मन जोशीची खास पोस्ट
‘गोलमाल ५’ चा व्हिडीओ चित्रपटातील इतर कलाकारांनीदेखील शेअर केला आहे. अभिनेता अर्शद वारसीने इन्स्टाग्रामवर शेअर करीत लिहिले की, २० वर्षे झाली आणि काहीच नाही बदलले… ‘गोलमाल’ तुमचे मनोरंजन करत राहील. तर अभिनेता शर्मन जोशीने व्हिडीओ शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले ‘सर्व जुन्या आठवणींचा बाप’ (Baap of All Throwbacks). त्यामुळे ‘गोलमाल ५’ चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
