Rohit Shetty House Firing Updates : बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या जुहू येथील घराबाहेर रविवारी ( १ फेब्रुवारी ) पहाटे गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यानंतर रोहित शेट्टीच्या घराबाहेरच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी हा संपूर्ण परिसर सील केला आहे. तसेच ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. सध्या रोहित शेट्टीच्या घराजवळच्या परिसरात पोलिसांसह फॉरेन्सिक टीमचा तपास सुरू असल्याने या भागात अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

रविवारी, पहाटे १२.४३ च्या सुमारास रोहित शेट्टीच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर अज्ञातांकडून चार राउंड फायरिंग करण्यात आली आहे. या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. घरातील सर्व सदस्य सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या घटनास्थळाजवळचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रोहित शेट्टीच्या बाल्कनीच्या काचेच्या एका पॅनेलवर गोळीबार झाल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत. त्याच्या घराला दोन प्रवेशद्वार आहेत. या टॉवरच्या परिसरात १० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले दिसतात. सध्या हे फुटेज पोलीस तपासत आहेत. ही घटना मध्यरात्री घडली असून हल्लेखोरांची नेमकी संख्या अद्याप समोर आलेली नाही.

तथापि, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गोळीबाराच्या घटनेची पुष्टी केली असून, या प्रकरणी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेकडून तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे रोहित शेट्टी राहत असलेल्या जुहू परिसरात अनेक सेलिब्रिटींची घरं आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा उच्चभ्रू भागांतील सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागील कारण सध्या अस्पष्ट आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि फॉरेन्सिक पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. हा गोळीबार धमकी देण्यासाठी होता की त्यामागे इतर काही कारण होतं, याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, ही गोळीबार झाल्याची घटना घडल्यावर रोहित आणि त्याच्या कुटुंबाने याबाबत अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेलं नाही.