प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषा आणि प्रामुख्याने मराठी कलाकार नेहमीच विशेष भूमिकेत पाहायला मिळतात. त्यांच्या ‘सिंघम’पासून ते ‘सर्कस’ आणि ‘गोलमाल’पर्यंतच्या अनेक चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. एकदा रोहित शेट्टीने स्वतः चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांना घेण्यामागचं कारण सांगितलं होतं.
‘सर्कस’ चित्रपटातील कलाकारांबरोबर रोहित शेट्टीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये हजेरी लावली होती. ‘सर्कस’मध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर व अश्विनी काळसेकर हे मराठी कलाकारही होते. रोहितच्या अनेक चित्रपटांत मराठी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळतात. मराठी कलाकारांना चित्रपटात घेण्याबद्दल रोहितने हास्यजत्रेत केलेल्या वक्तव्याची प्रचंड चर्चा झाली होती.
मराठी कलाकार कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेत काम करतात – रोहित शेट्टी
“तू मराठी कलाकारांना तुझ्या चित्रपटात का घेतोस? असा प्रश्न मला अनेक जण विचारतात. यामागे काहीतरी कारण आहे. मराठी कलाकार हे साधे व प्रतिभावान आहेत. ते अहंकारी नसतात. उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे करणारे अनेक कलाकार आहेत. पण मराठी कलाकार कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेत काम करतात. याबरोबरच मला चित्रपटातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ६० टक्के वाटा हा महाराष्ट्रातून येतो”, असं रोहित शेट्टी म्हणाला होता.
रोहित शेट्टीबरोबर काम करणारे मराठी कलाकार
- सिद्धार्थ जाधव हा रोहित शेट्टीचा अत्यंत लाडका अभिनेता मानला जातो. त्याने रोहितच्या अनेक चित्रपटांमध्ये कॉमेडी आणि महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. त्यात गोलमाल रिटर्न, सिंबा, सर्कस, सूर्यवंशी व सिंघम अगेन यांचा समावेश आहे.
- श्रेयस तळपदेने गोलमाल रिटर्न्स, गोलमाल ३, आणि गोलमाल अगेनमध्ये लक्ष्मणची भूमिका केली आहे.
- मराठी चित्रपटसृष्टीचे ‘मामा’ अशोक सराफ यांनी सिंघम चित्रपटात साकारलेली ‘हेड कॉन्स्टेबल सावळकर’ यांची भूमिका प्रचंड गाजली. अजय देवगणबरोबरचे त्यांचे सीन्स चित्रपटाचा मुख्य आकर्षण होते.
- अश्विनी काळसेकर रोहित शेट्टीच्या गोलमाल रिटर्न, गोलमाल ३, सिंघम रिटर्न, गोलमाल अगेन, आणि सर्कस चित्रपटात काम केलं होतं.
- आपल्या अचूक कॉमिक टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेले विजय पाटकर रोहितच्या अनेक चित्रपटांत दिसले आहेत. त्यात सिंघम, सिंघम रिटर्न्स, दिलवाले, आणि सर्कस सिनेमांचा समावेश आहे.
- त्याचबरोबर सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, वैदेही परशुरामी, अशोक समर्थ, सुचित्रा बांदेकर, अनंत जोग व महेश मांजरेकर यांनी रोहित शेट्टीबरोबर काम केलंय.
