गायक रूप कुमार राठोड बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा आपल्या गाण्यामुळे चर्चेत आहेत. ‘बॉर्डर 2’ मधील ‘घर कब आओगे’ या गाण्यात त्यांचा आवाज ऐकून चाहते खूप खूश आहेत. रूप कुमार राठोड यांनी त्यांच्या करिअरमध्ये फार कमी गाणी गायली असली, पण जी गायली ती प्रेक्षकांना फार आवडली. रूप कुमार राठोड यांच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. त्यांच्या गाण्यांप्रमाणेच त्यांची लव्ह स्टोरीही खास आहे, कारण त्यांनी समाजाची पर्वा न करता आपल्या गुरूच्या पत्नीशी लग्न केलं होतं.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण रूप कुमार राठोड यांनी अनूप जलोटा यांच्या पहिल्या पत्नीशी लग्न केलं आहे. अनूप जलोटा हे रूप कुमार यांचे गुरू होते. सोनालीचं पहिलं लग्न अनूप जलोटा यांच्याशी झालं होतं. रूप कुमार अनूप यांच्याकडे संगीत शिकायला जायचे, तेव्हा सोनाली अनूप जलोटा यांची पत्नी होती.

रिपोर्ट्सनुसार, रूप कुमार राठोड आणि सोनाली यांची मैत्री अनुप जलोटा यांच्या घरी झाली होती. कालांतराने या मैत्रीचे रुपांतर नात्यात झाले आणि दोघांमधील जवळीक वाढली. पण हे नातं सामाजिक आणि व्यावसायिकदृष्ट्या योग्य नव्हतं. त्यांचं गुपचूप अफेअर सुरू होतं, पण जेव्हा या नात्याबद्दल अनुप जलोटा यांना समजलं, तेव्हा ते भडकले.

अनूप जलोटांना सोडून सोनालीने रूप कुमार राठोडशी केलं लग्न

सोनाली व रूप कुमार यांचं नातं वादग्रस्त होतं. कारण सोनाली विवाहित होत्या. सोनालीच्या अफेअरमुळे अनूप जलोटा व रूप कुमार राठोड यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. पण तरीही रूप कुमार मागे हटले नाहीत. दोघांनीही सर्वांच्या विरोधात जाऊन १९८९ मध्ये एकमेकांशी लग्न केलं. त्या काळी संगीत जगतात अनूप जलोटा यांचा खूप प्रभाव होता आणि त्यामुळे रूप कुमार यांना काम मिळण्यात अडचणी येऊ लागल्या, असंही म्हटलं गेलं होतं.

अनूप जलोटा व रूप कुमार राठोड यांच्याबद्दल बऱ्याच अफवा पसरल्या, पण त्याबद्दल अधिकृतपणे दोघांनीही बोलणं टाळलं. अनूप जलोटा यांनी रूप कुमार राठोड यांच्या करिअरला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचं जाहीरपणे मान्य केलं नाही किंवा रूप कुमार राठोड यांनी त्यांच्यावर कोणतेही आरोप केले नाहीत. एवढ्या मोठ्या वादानंतरही रूप कुमार राठोड यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध केले.

सोनाली आणि रूप कुमार राठोड यांच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. पण दोघेही अजूनही एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीच उघडपणे बोलत नाहीत. पण आताही त्यांच्यातलं प्रेम पाहायला मिळतं.

अनूप जलोटा यांचं वैवाहिक आयुष्य

दुसरीकडे, अनूप जलोटा यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी तीन वेळा लग्न केले पण आता ते एकटे आहेत. सोनालीने त्यांना रूप कुमार राठोडसाठी सोडलं. मग त्यांनी बीना भाटियाशी दुसरं लग्न केलं, पण ते नातंदेखील फार काळ टिकलं नाही. अनूप जलोटा यांनी मेधा गुजरालशी तिसरं लग्न केलं, पण मेधा यांचं निधन झालं. मेधाचं पहिलं लग्न दिग्दर्शक शेखर कपूरशी झालं होतं.