Mohan Bhagwat On Dhurandhar Success : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटावर फक्त भारतातूनच नाही, तर जगभरातून पसंतीची मोहोर उमटली आहे. हा बिग बजेट चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान हिट ठरला. या चित्रपटानं १३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झालाय.
‘धुरंधर’ हा चित्रपट ३० जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. जे लोक थिएटरला जाऊन हा चित्रपट पाहू शकले नाहीत, ते ओटीटीवर हा चित्रपट पाहतायत. ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर ‘धुरंधर’ नेटफ्लिक्सवर ट्रेंड होत आहे. ‘धुरंधर’चं प्रेक्षकांनी आणि इंडस्ट्रीतल्या कलाकारांनी भरभरून कौतुक केलं. काही जण अजूनही कौतुक करतायत. अशातच ‘धुरंधर’च्या यशाबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाकडून मुंबईत दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘धुरंधर’च्या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली. ‘धुरंधर’च्या यशामागे संघाचं ‘व्हिस्परिंग’ असल्याचं मोहन भागवत यांनी म्हटलं. नेमकं ते काय म्हणालेत? चला जाणून घेऊ…
‘धुरंधर’सारखे सिनेमे अजून बनले पाहिजेत, यासाठी संघ आणि सरकार काय करू शकतं, या प्रश्नावर सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “असे जे सिनेमे आले आहेत, ज्याचा व्हिस्परिंगद्वारे स्वयंसेवकांनी प्रचार केला आहे. एक जण बघतो आणि तो अनेकांना सांगतो की ‘हा सिनेमा बघा’. याचा सिनेमांना अप्रत्यक्षरीत्या फायदा होतोच. त्यामुळे आता लोक वाट बघत आहेत की, पुढे कुठला सिनेमा येणार…”
त्यानंतर ते म्हणाले, “समाजात असं एक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे असे सिनेमे बनतात तेव्हा ते चालतात. म्हणून सिनेमे चालण्यात संघाच्या स्वयंसेवकांचंसुद्धा योगदान आहे. कधी कधी शाखांमधून स्वयंसेवकांना असे सिनेमे दाखवण्यासाठी नेलं जातं. ५०० लोक आले, तर किती कन्सेशन मिळणार अशा चर्चासुद्धा होतात. संघ हे काही प्लॅनिंगने करत नाही. स्वयंसेवकांच्या मनात राष्ट्राविषयीच्या ज्या भावना आहेत, त्या सिनेमात दाखवल्या गेल्या आहेत, असं वाटतं. म्हणून सगळे मिळून सिनेमे बघतात, हे सगळं आपोआप होतं.”
दरम्यान, ‘धुरंधर’च्या पहिल्या यशस्वी भागानंतर आता पुढच्या महिन्यात दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १९ मार्च रोजी ‘धुरंधर’चा दुसरा भाग ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हिंदीसह तेलुगू, तमीळ, कन्नड व मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

