Rujuta Diwekar Hair Care Tips: आपले केस लांब व दाट असावे, अशी अनेकांची इच्छा असते. पण बदललेल्या जीवनशैलीमुळे आता केस गळणे, केस पातळ होणे आणि रुक्ष दिसणे ही एक सामान्य समस्या सर्वांना भेडसावत आहे. आपल्या केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी लोक महागडे हेअर प्रोडक्ट्स, स्पा आणि इतर ट्रीटमेंट्सचा आधार घेतात, पण बऱ्याचदा त्याचे फायदे अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपण केसांची बाहेरून काळजी घेतो, पण त्यांना मिळणाऱ्या अंतर्गत पोषणाकडे दुर्लक्ष करतो.

अभिनेत्री करीना कपूर खानची न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. तिच्या मते, निरोगी आणि मजबूत केसांसाठी योग्य आहार आणि संतुलित जीवनशैली अत्यंत महत्त्वाची आहे. केसांचे आरोग्य थेट आपल्या शरीराच्या आरोग्याशी जोडलेले असते. त्यामुळे सर्वात आधी ‘क्रॅश डायटिंग’ करणे आणि कॅलरीज कमी करणं टाळलं पाहिजे.

केसांसाठी सुपरफूड ठरणारे पदार्थ

भात खाणं बंद करू नका

आहारातून तांदळासारखे कार्बोदके पूर्णपणे काढून टाकणे केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ऋजुता दिवेकरांनी सल्ला देतात की, दिवसातून किमान एकदा तरी भात आवर्जून खावा. कारण यामुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच, शिवाय केसांचे पोषणही होते.

हंगामी फळं खा

ऋजुता यांच्यामते, तुमच्या भागातील स्थानिक आणि हंगामी फळांचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. पेरू, आवळा आणि आंबा यांसारखी फळं व्हिटॅमिन-सी ने भरपूर असतात, जी शरीरातील लोहाचं प्रमाण वाढवण्यास मदत करतात. जेव्हा शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी चांगली असते, तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम केसांची मजबुती, घनता आणि चमक यावर दिसून येतो.

रोजच्या आहारात डाळी आणि कडधान्यांचा समावेश करा

ऋजुता यांच्या मते, डाळी आणि कडधान्यांचाही रोजच्या आहारात समावेश असावा. मूंग, तुरीची डाळ आणि चवळी यांमध्ये अमिनो ॲसिड, व्हिटॅमिन-बी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे पोषक घटक केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि केस तुटण्यापासून वाचवतात. यांचे नियमित सेवन केल्यास केसात चांगली सुधारणा दिसून येते.

अळीवच्या बिया

अळीवच्या बिया केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. यामध्ये फॉलिक ॲसिड आणि अनेक आवश्यक पोषक घटक असतात, यामुळे केस आणि त्वचा दोघांनाही पोषण मिळतं. या बियांचा पूर्ण फायदा मिळावा, यासाठी त्या पारंपरिक पद्धतीने लाडू किंवा खीर स्वरूपात खाव्यात, असा सल्ला ऋजुता यांनी दिला.

लाइफस्टाइलमध्ये सुधारणा करा

  • खाण्यापिण्याबरोबरच जीवनशैलीतील काही साध्या सवयी केसांच्या आरोग्यात मोठा बदल घडवून आणू शकतात.
  • केसांना तेल लावणे- आठवड्यातून एकदा केसांना तेल लावावं आणि किमान ३० मिनिटं ते राहू द्या, यामुळे टाळूला पोषण मिळतं.
  • केस विंचरणे – नियमितपणे केस विंचरल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.
  • नैसर्गिक रूपाचा स्वीकार: वारंवार हेअर स्टायलिंग ट्रीटमेंट्स, स्ट्रेटनिंग किंवा कर्लिंग करणं टाळावं आणि आपल्या नैसर्गिक केसांची काळजी घ्यावी.