Saajan director on Sanjay Dutt Madhuri Dixit affair rumors: सलमान खान, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांचा १९९१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘साजन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली होती. या तिन्ही कलाकारांना त्यांनी केलेल्या भूमिकांसाठी प्रचंड प्रेम मिळालं होतं. त्याचवेळी आणखी एका गोष्टीची जोरदार चर्चा रंगली होती, ती म्हणजे संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्यातील कथित अफेअर. या अफेअरची सुरुवात ‘साजन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती, असं म्हटलं जायचं.
विकी ललवानी यांना दिलेल्या मुलाखतीत, दिग्दर्शक लॉरेन्स डिसूझा यांनी या दोघांच्या अफेअरच्या चर्चांवर भाष्य केलं. ते म्हणाले, “आम्ही शूटिंगदरम्यान खूप मज्जा करत होतो, त्यामुळे आम्ही या गोष्टींकडे कधीच लक्ष दिलं नाही. चित्रपट कधी पूर्ण झाला हे आम्हाला समजलंच नाही. खरं तर त्यांचही नक्की काय चाललंय, याकडे आमचं लक्षच गेलं नाही.”
संजय माधुरीचे क्लोज-अप्स पाहायचा- लॉरेन्स डिसूझा
लॉरेन्स डिसूझांनी एक आठवण सांगितली. जेव्हा माधुरीचे क्लोज-अप शॉट्स शूट व्हायचे, तेव्हा संजय कधीकधी कॅमेऱ्यातून पाहायचा. लॉरेन्स हे ‘साजन’चे दिग्दर्शक व कॅमेरामनही होते. ते म्हणाले, “मीच कॅमेरामन आणि दिग्दर्शक होतो, त्यामुळे जेव्हा मी माधुरीचे क्लोज-अप शॉट्स घ्यायचो, तेव्हा कधीकधी संजय कॅमेऱ्यातून तिला पाहायचा. तो तिच्याकडे पाहायचा, पण त्यांच्यात खरंच काही चाललंय की नाही, याचा मी कधीच विचार केला नाही.”
१९९३ मध्ये संजय दत्तला अटक झाली, त्यानंतर या दोघांचं ब्रेकअप झालं असं म्हटलं जातं. त्याबद्दल डिसूझा म्हणाले, “मी या गोष्टी फक्त बातम्यांमध्ये पाहिल्या होत्या.” कुटुंबाच्या विरोधामुळे माधुरी संजयपासून दूर झाली, असं म्हटलं जातं. त्याबद्दल विचारल्यावर काहीच कल्पना नसल्याचं डिसूझांनी सांगितलं.
माधुरी दीक्षितच्या वक्तव्याचा मला फरक पडत नाही – संजय दत्त
ऑक्टोबर १९९३ मध्ये जामिनावर बाहेर आल्यानंतर संजय दत्तने ‘मूव्ही मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीत या अफवांवर आणि माधुरीबरोबरच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली होती. माधुरीने तुझ्याशी कोणतंही नातं असल्याची गोष्ट नाकारली आहे, त्यावर संजय म्हणालेला, “तिच्या वक्तव्याने मला काही फरक पडत नाही. मी तिचा सहकलाकार होतो आणि आम्ही अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. मला माझ्या सर्व सहकलाकारांशी चांगले संबंध ठेवावे लागतात, मग ती माधुरी असो वा श्रीदेवी. उदाहरणार्थ, ‘गुमराह’ चित्रपटाच्या पहिल्या काही दिवसांत मी तितका कम्फर्टेबल नव्हतो, कारण श्रीदेवीचा स्वभाव शांत आणि रिझर्व्ह आहे. त्यामुळे मला तिच्याशी बोलावं लागलं होतं, म्हणूनच माधुरीने जे काही म्हटलं, त्याने मला अजिबात फरक पडला नाही.”
मी माधुरी दीक्षितची माफी मागितली होती – संजय दत्त
अफेअरच्या बातम्या समोर आल्यानंतर आपण स्वतः माधुरीची माफी मागितली होती, असं संजय दत्तने सांगितलं होतं. “साजनच्या काळात ही बातमी पसरली होती. वृत्तपत्रांमध्ये ही बातमी आली तेव्हा ती केनियामध्ये ‘खेल’ चित्रपटाचे शूटिंग करत होती. त्यानंतर जेव्हा ‘साजन’चे शूटिंग सुरू झाल्यावर मी तिच्याकडे गेलो आणि तिची माफी मागितली. कारण कोणतीही चूक नसताना तिला लोकांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागत होतं,” असं संजय दत्तने सांगितलं होतं.
माझं माधुरीबरोबर अफेअर असतं तर बरं झालं असतं – संजय दत्त
तुम्ही खरंच एकमेकांना डेट करत होतात का? असा थेट प्रश्न विचारल्यावर संजयने मिश्किलपणे उत्तर दिलं होतं. “माझं माधुरीबरोबर अफेअर असतं तर बरं झालं असतं, पण तसं काही नव्हतं. मी माझ्या प्रत्येक सहकलाकाराशी मित्राप्रमाणे राहतो. तुम्ही मला रवीना टंडनबरोबर पाहिलं तर तुम्हाला वाटेल की माझं तिच्याबरोबरही अफेअर आहे,” असं संजयने म्हटलं होतं. तसेच लग्नाच्या अफवांवर “माझं तिच्याशी लग्न होण्यासाठी आधी आमच्यात काहीतरी असायला हवं ना,” असं संजय दत्त म्हणाला होता.
संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांनी ‘थानेदार’ (१९९०), ‘साजन’ (१९९१) आणि ‘खलनायक’ (१९९३) यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यानंतर अनेक वर्षांनी २०१९ मध्ये ‘कलंक’ चित्रपटात ते पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र आले होते.
