शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी (टायगर पतौडी) यांना सैफ अली खान, सोहा व सबा अली खान अशी तीन अपत्ये आहेत. सैफ व सोहाने आईच्या पावलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीत करिअर केलं. पण सबा मात्र प्रसिद्धीपासून दूर राहणं पसंत करते. असं असलं तरीही तिच्यावर कुटुंबाच्या भोपाळमधील १००० कोटी रुपयांच्या वारशाची मोठी जबाबदारी सबाकडे सोपवण्यात आली होती. मन्सूर पतौडी हे भोपाळच्या नवाब बेगम साजिदा सुलतान यांचे पुत्र होते. साजिदा सुलतान यांचं लग्न पतौडीचे आठवे नवाब इफ्तिकार अली खान पतौडी यांच्याशी झाला होता. भोपाळच्या नवाब बेगम म्हणून साजिदा सुलतान यांच्यावर काही जबाबदाऱ्या होत्या. त्यांच्या निधनानंतर त्यांनी त्या जबाबदाऱ्या टायगर यांच्याकडे सोपवल्या आणि मन्सूर यांनी पुढे सबा हिला भोपाळ प्रकल्पाची ‘मुतवल्ली’ बनवले.

‘मुतवल्ली’ म्हणजे एखाद्या वक्फचा विश्वस्त किंवा व्यवस्थापक. सबा ही ‘औकाफ-ए-शाही’ या ट्रस्टची ‘मुतवल्ली’ आहे. त्या ट्रस्टचं कामकाज आधी तिच्या वडिलांनी आणि आजींनी चालवलं होतं. ‘शी द पीपल टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत सबाने सांगितलं की या जबाबदाऱ्यांबद्दल तिला तिच्या वडिलांनीच शिकवलं होतं. “हा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली होती,” असं सबा म्हणाली.

पतौडी कुटुंबाचा १००० कोटींहून अधिकचा वारसा

हा “१००० कोटी रुपयांहून अधिकचा वारसा” आहे का? असं विचारल्यावर सबाने होकार दिला. “भोपाळ प्रोजेक्ट हा मक्का आणि मदिनेच्या व्यवस्थेशीही जोडलेला आहे. रुबात (पारंपरिक चॅरिटेबल गेस्ट हाऊस) म्हणजेच जेव्हा भोपाळमधून हज यात्री हजसाठी जातात, तेव्हा त्यांच्या राहण्याची सोय करण्यासाठी आम्ही इमारती विकत घेतो.”

saba-ali-khan-pataudi-family-bhopal-property-legacy
शर्मिला टागोर व त्यांच्या मुली सोहा व सबा (फोटो- इन्स्टाग्राम)

सबावर कोणत्या जबाबदाऱ्या आहेत?

सबाने पुढे सांगितलं की ‘औकाफ-ए-शाही’ अंतर्गत येणाऱ्या वास्तूंची देखभाल आणि लॉजिस्टिकची जबाबदारी तिच्यावर आहे. “यात बऱ्याच पैशांचा व्यवहार असतो, पण हे पैसे भारतात परत येत नाहीत किंवा वैयक्तिक कामासाठी वापरले जात नाहीत. ही एक चॅरिटी संस्था आहे जी सौदीच्या स्वतंत्र व्यक्ती चालवतात, पण आम्ही त्यांच्याशी संलग्न आहोत. त्यामुळे ही एक अतिशय मानाची जबाबदारी आहे आणि हा वारसा पुढे नेण्यासाठी मीच जास्त योग्य आहे, असं माझ्या वडिलांना वाटलं होतं,” असं सबाने नमूद केलं.

saba-ali-khan-pataudi-family-bhopal-property-legacy
सैफ अली खान, सोहा व सबा अली खान (फोटो- इन्स्टाग्राम)

भोपाळमधील कौटुंबिक मालमत्तेबाबत काही खटले अद्याप न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत. ते निकाली लागल्यानंतर तिला मुलींसाठी एक शाळा, महिलांसाठी एक रुग्णालय सुरू करायचे आहे आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवायचं आहे.

सबाने सांगितलं की ‘मुतवल्ली’ हे पद नेहमीच महिलांसाठी होतं, पण ती जबाबदारी अपवादात्मक परिस्थितीत तिच्या वडिलांनी पार पाडली. याबद्दल सबा म्हणाली, “मला तो मान मिळतो, कारण त्यांना माहीत आहे की मी काम गांभीर्याने करते आणि सहज हार मानणारी नाही. त्यामुळेच मी यशस्वी ठरले. मी हे काम व्यवस्थित पार पाडतेय याबद्दल मला स्वतःचा खूप अभिमान आहे.”

saba-ali-khan-pataudi-family-bhopal-property-legacy
सबा, सोहा व सैफ अली खान (फोटो- इन्स्टाग्राम)

पतौडीच्या नवाबांचे भोपाळ संस्थानशी कनेक्शन

साजिदा सुलतान यांचे वडील हमीदुल्ला खान हे भोपाळचे शेवटचे नवाब होते. त्यांनी १९६० मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत हे पद भूषवलं. त्यांची मोठी मुलगी आबिदा बेगम ही त्यांची कायदेशीर वारस होती, पण १९५० साली ती पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाली. त्यानंतर आबिदाची लहान बहीण साजिदाला १५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती मिळाली.

साजिदा बेगम यांचा विवाह पतौडीचे नवाब इफ्तिकार अली खान पतौडी यांच्याशी झाला होता. इफ्तिकार आणि साजिदा यांचे सुपुत्र मन्सूर अली खान ‘टायगर’ पतौडी हे प्रसिद्ध क्रिकेटपटू होते, त्यांनी अभिनेत्री शर्मिला टागोरशी लग्न केलं होतं.