Sachin Pilgaonkar Remembers Sanjeev Kumar : दिग्गज अभिनेते दिवंगत संजीव कुमार आणि सचिन पिळगांवकर यांच्यातील घट्ट मैत्री संपूर्ण बॉलिवूडला माहीत होती. खरं तर सचिन संजीव कुमार यांच्यापेक्षा वयाने खूप लहान होते, पण तरीही ते एकमेकांशी खूप गप्पा मारायचे. संजीव कुमार यांचं अकाली निधन झालं. पण निधनाच्या दिवशी घडलेला प्रसंग आजही सचिन यांच्या अंगावर काटा आणतो. संजीव कुमार यांनी सचिन यांना सकाळी लवकर भेटायला बोलावले होते, पण कामामुळे सचिन दुपारी २:३० वाजता त्यांच्या घरी पोहोचले. संजीव कुमार बेडरूममधून बाहेर येत नसल्याने सचिन यांनी आत जाऊन पाहिले असता गालिच्यावर त्यांचा मृतदेह पडलेला दिसला.

त्यांनी मला लवकर यायला सांगितलं होतं – सचिन पिळगांवकर

‘बॉलीवूड आज और कल’शी बोलताना सचिन यांनी सांगितलं की, ते संजीव कुमार यांना त्यांच्या निधनाच्या एक दिवसाआधी भेटले होते. “मी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. खरं तर, मी त्यांना आदल्या दिवशी ते डबिंग करत असताना भेटलो होतो. मी त्यांना सांगितलं की मला दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायचंय. त्यावर ते म्हणाले, ‘सकाळी ये.’ मी त्यांना म्हटलं की मी त्याऐवजी दुपारी येईन. त्यांनी विचारलं, ‘थोडं आधी नाही येऊ शकणार का?’ मी म्हटलं मला थोडं काम आहे, ते संपवून येईल. त्यावर ते म्हणाले, ‘ठीक आहे.'”

त्यांनी मला सांगितलं की त्यांची प्रकृती बरी नाही – सचिन पिळगांवकर

सचिन पिळगांवकर दुपारी २:३० च्या सुमारास संजीव कुमार यांच्या घरी पोहोचले, तेव्हा ते खोलीत असल्याचं समजलं. “ते कुठे आहेत असं मी विचारलं, तेव्हा स्टाफने सांगितलं की ते त्यांच्या खोलीत अंघोळ करत आहेत. मी अर्धा तास वाट पाहिली, मग विचारलं की त्यांची प्रकृती बरी नाहीये का? त्यांनी होकार दिला आणि सांगितलं की त्यांचा सेक्रेटरी डॉक्टरांना आणण्यासाठी गेला आहे. काही वेळाने जमनादास जी डॉक्टर गांधी यांच्याबरोबर आले. मी काय झालंय असं विचारल्यावर समजलं की त्यांना उलटी झाली होती. आदल्या रात्री ते खूप उशिरा, म्हणजे ३ किंवा ४ वाजता घरी आले होते,” असं सचिन पिळगांवकर यांनी सांगितलं.

“बरं नसूनही त्यांनी इतक्या उशीरापर्यंत काम केलं, याबद्दल मी त्यांच्यावर रागावणार असं मी तिथे सर्वांना सांगितलं. ते माझे मित्र आणि मार्गदर्शक होते. आमचं नातं इतकं घट्ट होतं की आम्ही एकमेकांशी कुठल्याही विषयावर बोलू शकत होतो,” असं सचिन म्हणाले. जसजसा वेळ पुढे सरकत होता, तसतशी सचिन यांची काळजी वाढत होती. कारण संजीव कुमार यांच्या खोलीत जायला कोणीच तयार नव्हतं.

Sachin Pilgaonkar Sanjeev Kumar
संजीव कुमार व सचिन पिळगांवकर (Photo: Facebook/Sanjeev Kumar Admirers)

“मला जाणवलं की काहीतरी गडबड आहे. ते कधीच इतका वेळ घेत नव्हते. आत जायला कोणीही तयार नव्हतं, मग मी स्वतःच आत जायचं ठरवलं. मला वाटलं फार फार तर काय, ते कपडे बदलत असतील, मी माफी मागून दार बंद करेन,” असं सचिन पिळगांवकर म्हणाले.

मी गालिच्यावर त्यांचे पाय पाहिले – सचिन पिळगांवकर

सचिन यांनी संजीव कुमार यांच्या बेडरूमचे दार हळूच उघडले आणि समोरचे दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. सचिन पिळगांवकर म्हणाले, “सुरुवातीला मला कोणीच दिसलं नाही. मग माझी नजर गालिच्यावर असलेल्या दोन पायांवर पडली. मी पाहिलं तर ते जमिनीवर पालथे पडले होते आणि त्यांचा एक हात दाराकडे होता. मी मोठ्याने ओरडलो आणि लगेच डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर आत आले, त्यांनी त्यांना सरळ केलं आणि त्यांची छाती दाबून श्वास परत आणण्याचा प्रयत्न केला. पण मग डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं खूप वेळापूर्वीच निधन झालंय. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली.”

संजीव कुमार यांनी मांसाहार करण्यासाठी भाड्याने घेतलेला फ्लॅट

६ नोव्हेंबर १९८५ रोजी अवघ्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने संजीव कुमार यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र त्यांच्या आठवणींना उजाळा द्यायचे. संजीव कुमार यांचे अती मद्यपान, रात्री उशिरा जेवण्याची सवय आणि सततची धावपळ यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला होता, असं अभिनेते परिक्षित साहनी म्हणाले होते.

संजीव कुमार यांच्या कुटुंबात मांसाहाराला परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांनी फक्त मांसाहार करण्यासाठी मुंबईतील पाली हिल इथे एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. तिथे संजीव कुमार हे शम्मी कपूर, शत्रूघ्न सिन्हा, रणधीर कपूर आणि सचिन यांच्याबरोबर रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करायचे. पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यपान करून मग ते मांसाहाराचा आस्वाद घ्यायचे.

संजीव कुमार यांनी केलेलं स्वतःच्या मृत्यूचं भाकित

दिवंगत अभिनेत्री तबस्सूम यांनी संजीव कुमार यांची एक आठवण सांगितली होती. त्यांना पडद्यावर वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींच्या भूमिका साकारायला खूप आवडायच्या. “एका ज्योतिषाने मला सांगितलं होतं की मी जास्त काळ जगणार नाही आणि माझं म्हातारपण पाहू शकणार नाही. म्हणूनच मी चित्रपटांमध्ये वयाने मोठ्या असलेल्या भूमिका साकारतो, जेणेकरून खऱ्या आयुष्यात मला अनुभवता न येणारा तो टप्पा मी पडद्यावर जगू शकेन,” असं संजीव कुमार यांनी आपल्याला सांगितल्याचं तबस्सूम म्हणाल्या होत्या.