Sachin Pilgaonkar on Dharmendra: बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे ८९ व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना सुरुवातीला रुग्णालयात दाखल केले गेले होते. त्यानंतर त्यांच्यावर घरात उपचार सुरू होते.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अमिताभ बच्चन, आमिर खान यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या अंतिम संस्कारासाठी पोहोचले आहेत.

अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे. करण जोहर याने धर्मेंद्र यांचा फोटो शेअर करीत त्यांच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. ही भावूक पोस्ट शेअर करताना त्याने शेवटी ‘अभी ना जाओ छोडकर…’ या गाण्याच्या ओळीदेखील लिहिल्या आहेत. तर, अभिनेत्री करीना कपूर खानने धर्मेंद्र यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वडील रणधीर कपूर आणि धर्मेंद्र यांचे फोटो तिने शेअर केले आहेत.

Award Banner

सचिन पिळगांवकर यांनी व्यक्त केल्या भावना

अभिनेते सचिन पिळगांवकर यांनीदेखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी धर्मेंद्र यांचे काही फोटो शेअर केले आहेत. दोन फोटोंमध्ये धर्मेंद्र आणि सचिन पिळगांवकर एकत्र दिसत आहेत.

हे फोटो शेअर करताना सचिन पिळगांवकरांनी लिहिले, “सर्वांत देखणे, दिग्गज धरमजी आपल्याला सोडून गेले; पण त्यांचा वारसा कायमच राहील. मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली यासाठी कृतज्ञ आहे. ही-मॅन( He-Man) आपल्या हृदयात कायमच जिवंत राहतील. “ओम शांती”, असे म्हणत सचिन पिळगांवकरांनी मनातील भावना व्यक्त करीत धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सचिन पिळगांवकरांनी शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली, अशा कमेंट्स केल्या आहेत. बॉलीवूड अभिनेत्री काजोलनेदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, धर्मेंद्र यांचे ‘फूल और पत्थर’, ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘सत्यकाम’ असे अनेक चित्रपट गाजले.