Sachin Pilgaonkar & Ranveer Singh : ‘एकापेक्षा एक’ या डान्स शोद्वारे लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी अनेक स्पर्धकांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमामध्ये त्यांनी मुख्य परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. एखाद्या स्पर्धकाने सादर केलेला परफॉर्मन्स त्यांना खूप जास्त आवडला की, सचिन पिळगांवकर आशीर्वाद म्हणून या स्पर्धकाला बक्षीस द्यायचे. आजच्या काळात असं बक्षीस तुम्हाला कोणत्या बॉलीवूड अभिनेत्याला द्यायला आवडेल? असा प्रश्न त्यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विचारण्यात आला. यावेळी सचिन पिळगांवकरांनी रणवीर सिंहचं नाव घेतलं.

‘धुरंधर’ सिनेमाच्या दोन्ही भागांमुळे सध्या रणवीर प्रचंड चर्चेत आहे. मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज मंडळींनी त्याचं कौतुक केलं आहे. आता सचिन पिळगांवकरांनी सुद्धा रणवीरच्या ‘धुरंधर’मधील भूमिकेचं कौतुक करत त्याचा ’83’ सिनेमाही मला खूप आवडला होता, असं या मुलाखतीत सांगितलं.

सचिन पिळगांवकर वैभव मुंजालच्या पॉडकास्टमध्ये म्हणाले, “रणवीर सिंहचा अभिनय मला ’83’ चित्रपटात खूप जास्त आवडला. मला रणवीर एक अभिनेता म्हणून खूप जास्त आवडतो. कारण, तो त्याच्या प्रत्येक भूमिकेत अगदी समरसून जातो. त्याची ही सवय मला फार आवडते, आणि जे कलाकार अशाप्रकारे एखाद्या भूमिकेत अगदी समरसून जातात आणि परफॉर्म करतात…असे सगळेच कलाकार मला खूप जास्त आवडतात. तो जेव्हा कधी मला भेटेल…तेव्हा मी त्याला नक्की बक्षीस देईन. मला ‘धुरंधर’मध्येही त्याचं काम खूप जास्त आवडलं.”

अभिनेते पुढे म्हणाले, “धुरंधरमध्ये सर्वांना अक्षय खन्ना खूप जास्त आवडला…आणि अर्थातच अक्षयने खूप छान काम केलं होतं. पण, धुरंधरच्या पहिल्या भागात रणवीरने साकारलेल्या भूमिकेवर मर्यादा होत्या…त्याला आपली ओळख रिव्हिल करायची नव्हती. प्रत्येक गोष्टीत ती ओळख लपवून, रागातही स्वत:ला कंट्रोल करणं…तो जो काही अभिनय रणवीरने केलाय, त्यासाठी त्याचं खूप कौतुक आहे.”

सिनेमा हे एकच पॅशन…

“जे हिंदी सिनेमे पाहून मला वाटलं की आपण दिग्दर्शक व्हायला पाहिजे…अशा काही सिनेमांची नावं मी तुम्हाला सांगतो. ‘कागज के फूल’, ‘प्यासा’, ‘Guide’, ‘तेरे मेरे सपने’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘तिसरी मंजिल’, ‘मदर इंडिया’, ‘सीमा’, ‘मुघल ए आझम’ हे सगळेच सिनेमे किती जबरदस्त आहेत, आणि आपण सर्वांनी पाहिले पाहिजेत. उत्तम कथा, दिग्दर्शन, कलाकार…सगळं परफेक्ट आहे. त्यावेळी लोक अशाच पॅशनने सिनेमे बनवायचे. सिनेमा हे एकच पॅशन त्या दिग्दर्शकांचं होतं.” असं सचिन पिळगांवकर यांनी सांगितलं.