Sachin Pilgaonkar Shares Dharmendra Memories : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी व चाहते यांना श्रद्धांजली वाहत आहेत. धर्मेंद्र खूप प्रेमळ स्वभावाचे होते. अनेकजण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे सचिन पिळगांवकर यांनी धर्मेंद्र यांच्याबरोबर काम केलं होतं. आता पिळगांवकरांनी धर्मेंद्र यांच्याबरोबरच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

“सर्वांत देखणे, दिग्गज धरमजी आपल्याला सोडून गेले; पण त्यांचा वारसा कायमच राहील. मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली यासाठी कृतज्ञ आहे. ही-मॅन( He-Man) आपल्या हृदयात कायमच जिवंत राहतील. “ओम शांती”, अशी पोस्ट धर्मेंद्र यांच्यासाठी सचिन पिळगांवकरांनी केली.

ई-टाइम्सशी बोलताना सचिन पिळगांवकर म्हणाले, “धरमजी हे फक्त सर्वात देखणे अभिनेते नव्हते, तर मी भेटलेल्या सर्वात नम्र व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. मी फक्त ९ वर्षांचा असताना त्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम केलं होतं. हृषिकेश मुखर्जींच्या ‘मझली दीदी’ सिनेमात मी मीना कुमारीजींच्या धाकट्या भावाची भूमिका केली होती, त्यात धरमजींनी त्यांच्या पतीची भूमिका केली होती. मी सेटवर अत्यंत देखण्या धर्मेंद्र यांना पाहिल्याचं आठवतं. ते केवळ सहकाऱ्यांशीच नव्हे तर सेटवरील प्रत्येकाशी प्रेमाने आणि आदराने बोलायचे.

‘यमला पगला दिवाना’ नावाचा किस्सा

सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीत ‘यमला पगला दिवाना’ या नावाबद्दलचा एक किस्सा सांगितला होता. “मी ९० च्या दशकातील उत्तरार्धात ‘यमला पगला दीवाना’ नावाचं सिनेमाचं शीर्षक ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन’कडे नोंदवून घेतलं होतं. एके दिवशी मला एका निर्मात्याचा फोन आला, त्याने मला ते शीर्षक मागितलं. पण मी नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी स्वतः धरमजी यांनी मला फोन केला. मी विचारलं ‘धरमजी कसे आहात?’ ते खूप प्रेमाने माझ्याशी बोलले. मग ते म्हणाले, ‘सचिन, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. तुमच्याकडे ‘यमला पगला दीवाना’ नावाचं शीर्षक आहे ना.’ मी म्हटलं, ‘नाही, ते आता ते माझ्याकडे नाही.’ धरमजी हसले आणि म्हणाले, ‘पण तुम्ही शीर्षक देण्यास नकार दिला, असं निर्मात्याने मला सांगितलं. मग मी त्यांना म्हटलं, ‘जोपर्यंत तुम्ही मला मागितलं नव्हतं तोपर्यंत ते शीर्षक माझं होतं. आता ते माझं नाही तर तुमचं आहे.’ ज्या माणसाने भारतीय चित्रपटसृष्टीत इतकं मोलाचं योगदान दिलं त्यांची परतफेड आपण कशी करणार? त्यांचा वारसा नेहमीच सर्वोच्च राहील,” असं धर्मेंद्र यांची आठवण सांगत सचिन पिळगांवकर म्हणाले.

सचिन पिळगांवकरांनी ‘रेशम की डोरी’ सिनेमात धर्मेंद्र यांच्या तरुणपणीची भूमिका केली होती. ५० वर्षांपूर्वी आलेल्या ‘शोले’मध्येही त्यांनी एकत्र काम केलं होतं. ‘दिल का हीरा’मध्ये सचिन धर्मेंद्र यांच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत होते. त्याचबरोबर क्रोधी नावाचा सिनेमा त्यांनी एकत्र केला होता. सचिन पिळगांवकरांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आजमाइश’मध्ये धर्मेंद्र मुख्य भूमिकेत होते.