मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही सचिन पिळगांवकर यांनी स्वतःचं असं अढळ स्थान निर्माण केलं आहे. छोट्या छोट्या भूमिकांमधून सचिन यांनी हिंदी चित्रपटात काम करायला सुरुवात केली, पण हिंदी चित्रपटसृष्टीत सचिन यांना स्टार बनवण्यात राजश्री प्रोडक्शनचा मोठा हात होता. निर्माते ताराचंद बडजात्या यांचे सुपुत्र राजकुमार बडजात्या यांनी सचिन पिळगांवकर यांना उत्तमोत्तम चित्रपट दिले. राजकुमार बडजात्या आणि सचिन पिळगांवकर यांच्यातील नातंदेखील वडील मुलासारखं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकुमार बडजात्या यांच्याबद्दलचा असाच एक किस्सा सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे. नुकतंच राजश्री प्रोडक्शनला ७५ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या युट्यूब चॅनलला सचिन पिळगांवकर यांनी खास मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राजकुमार बडजात्या यांच्याबरोबर असलेल्या नात्याबद्दल खुलासा केला. शिवाय जेव्हा राजकुमार बडजात्या मृत्यूशैयेवर होते तेव्हा त्यांची शेवटची इच्छा नेमकी काय होती याबद्दलही खुलासा केला आहे.

सचिन पिळगांवकर म्हणाले, “राज बाबू यांच्याबरोबर मी एकूण ५ चित्रपट केले. ‘अखियोंके झरोको से’, ‘गीत गाता चल’, ‘गोपाल किशन’, ‘नदीया के पार’ आणि ‘जाना पेहचाना’. यापैकी ‘जाना पेहचाना’ सोडल्यास बाकी ४ चित्रपट चांगलेच हीट झाले. ‘जाना पेहचाना’ फ्लॉप झाल्यानंतर आम्ही एकत्र काम केलं नाही, पण आमचे संबंध कायम सलोख्याचे राहिले. जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा खूप दुःख झालं आणि मी तातडीने त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी पोचलो. सुरज बडजात्या यांची भेट घेतली. तेव्हा सुरज बडजात्या म्हणाले की माझ्या मुलाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे.”

आणखी वाचा : ‘कयामत से कयामत तक’साठी आमिर खानला मिळालं होतं एवढं मानधन

नंतर सुरज बडजात्या यांच्या मुलाने राजकुमार बडजात्या यांच्याबद्दल सांगितलेली गोष्ट ऐकून सचिन पिळगांवकर खूप भावूक झाले. ते म्हणाले “सूरज यांच्या मुलाने सांगितलं की राजकुमार बडजात्या जेव्हा खूप आजारी होते तेव्हा आम्ही त्यांना रुग्णालयात घेऊन जायचं ठरवलं. डॉक्टरांनी आधीच आमच्या मनाची तयारी करून ठेवली होती, ते यातून बाहेर येणार नाहीत असंच त्यांनी सांगितलं होतं. जेव्हा राजकुमार बडजात्या यांना रुग्णवाहिकेतून नेत होते, तेव्हा त्यांच्या नातवाने त्यांना त्यांची इच्छा विचारली, तेव्हा राजकुमार बडजात्या हसून म्हणाले की मला सचिनचं ‘श्याम तेरी बन्सी पुकारे’ हे गाणं बघायचं आहे. मला सचिनला बघायचं आहे. त्यानंतर त्यांच्या नातवाने लगेच त्यांना मोबाइलवर ते गाणं दाखवलं आणि मग रुग्णालयात जाऊन त्यांनी नंतर अखेरचा श्वास घेतला. ही असतात नाती.”

मुलाखतीदरम्यान ही घटना सांगताना सचिन पिळगांवकर खूप भावूक झाले, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. सचिन पिळगांवकर यांच्याबरोबर राजश्री प्रोडक्शनने अजरामर चित्रपट दिले. नुकताच राजश्री प्रोडक्शनचा ‘उंचाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांच्या इतर चित्रपटांप्रमाणेच यातही कुटुंब, नातेसंबंध यावर भाष्य करण्यात आलं. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin pilgaonkar speaks about his relation with rajshri production and raj kumar barjatya avn
First published on: 06-12-2022 at 08:13 IST