Sachin Tendulkar called Rakesh Bedi after watching Dhurandhar 2: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या स्पाय थ्रिलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असतानाच, ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांच्या अभिनयाचीही चर्चा रंगली आहे. चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘जमील जमाली’ ही कपटी राजकारण्याची भूमिका आणि त्यांचा ‘बच्चा है तू मेरा’ हा डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राकेश बेदी यांनी खुलासा केला की, भारतरत्न सचिन तेंडुलकरने त्यांना स्वतः फोन करून त्यांच्या कामाचे कौतुक केले.

‘द लल्लनटॉप’शी बोलताना राकेश बेदी यांनी सांगितलं की, धुरंधर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी फोन करून त्यांच्या कामाचं कौतुक केलंय. पण त्यांच्यासाठी सर्वात खास फोन होता तो म्हणजे भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा. भारतरत्न सचिन तेंडुलकरने चित्रपट पाहिल्यावर राकेश बेदींना फोन करून काय म्हटलं, ते जाणून घेऊयात.

सचिन तेंडुलकर काय म्हणाला?

राकेश बेदी पुढे म्हणाले, “सचिन म्हणाले, ‘राकेश जी, मजा आली! काय षटकार मारलात तुम्ही!’ त्यावर मी म्हणालो, ‘हो, तुम्ही तर खूप षटकार मारले आहेत, पण तुमचे षटकार भारतात पडले आणि माझा षटकार मात्र पाकिस्तानात पडला आहे!'” चित्रपटातील आपल्या भूमिकेचा संदर्भ देत राकेश यांनी सचिनला हे मिश्किल उत्तर दिलं.

Award Banner

धुरंधरमधील राकेश बेदींची भूमिका

राकेश बेदी यांनी दिलेलं मजेशीर उत्तर त्यांच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ मधील भूमिकेशी संबंधित आहे. या चित्रपटात त्यांनी एका अशा राजकारण्याची भूमिका साकारली आहे, जो गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानच्या ‘ल्यारी’ भागात राहत आहे आणि तिथल्या राजकारणातील एक मोठा चेहरा बनला आहे. चित्रपटाच्या शेवटी त्याचं एक मोठं गुपित उलगडतं. तो शेवटी आपला जावई हमजा (रणवीर सिंह) याला सांगतो की, तो सुद्धा त्याच्यासारखाच एक भारतीय गुप्तहेर आहे.

धुरंधरची कथा

पहिल्या भागात रणवीर सिंह भारतीय गुप्तहेर म्हणून पाकिस्तानमध्ये जातो ते दाखवलं होतं. तो भारताला लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी नेटवर्कला संपवण्यासाठी नायनाट पाकिस्तानातील ल्यारीमधील राजकारणात जातो आणि तिथल्या अंडरवर्ल्डमध्ये आपलं स्थान निर्माण करतो. हा चित्रपट कंदहार विमान अपहरण, २००१ चा संसद हल्ला आणि २६/११ चा मुंबई हल्ला अशा ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीवर आधारित होता.

धुरंधर २ ची कमाई

धुरंधर २ मध्ये रणवीर सिंह याला हमजा अली मझारी बनण्यासाठी कसं प्रशिक्षण दिलं गेलं, ते दाखवलंय. तसेच, तो ल्यारीमध्ये सत्तेत येऊन भारताला धोका पोहोचवणाऱ्या दहशतवादी नेटवर्कला कसे उद्ध्वस्त करतो, हेही दाखवलंय. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात १००० कोटी रुपयांहून अधिक आणि जगभरात १५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.