Rajshri Deshpande Cancer: ‘ब्लॅक वॉरंट’ आणि ‘सेक्रेड गेम्स’ मधील आपल्या दमदार भूमिकांसाठी ओळखली जाणारी मराठी अभिनेत्री राजश्री देशपांडेला कर्करोगाचे निदान झाले आहे. राजश्रीला ग्रेड १ च्या स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. राजश्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ज्यात तिने प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

“हे वाचत आहात याचा अर्थ असा की, मला माझ्या आई-वडिलांना हे सांगण्याचं धाडस मिळालंय की मला ‘इनफिल्ट्रेटिंग डक्टल कार्सिनोमा’ म्हणजेच ग्रेड १ ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे”, असं राजश्रीने सांगितलं.

“सुदैवाने, नियमित तपासणीदरम्यान हा आजार सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात आला, त्यामुळे मला लढण्याची संधी मिळाली. निदानानंतर अनेक चाचण्या आणि शस्त्रक्रियांचा प्रवास एखाद्या रोलरकोस्टर राईडसारखा होता. पण तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे मी यातून बाहेर पडू शकले. शस्त्रक्रियेनंतर माझ्या आई आणि बाबांचे चेहरे पाहून माझ्या मनातली भीती नाहीशी झाली आणि मला ताकद मिळाली. सर्वांच्या पाठिंब्यामुळे आता मी पुन्हा एकदा जग जिंकायला तयार आहे,” असं राजश्री म्हणाली.

राजश्री देशपांडेची पोस्ट

“आता मी खूप चांगल्या प्रकारे रिकव्हर होत आहे आणि लवकरच हॉस्पिटलमधून घरी जाणार आहे. तुमचे प्रेम हेच माझे सर्वात मोठे औषध आहे,” असं म्हणत राजश्री देशपांडेने कोकिलाबेन हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे आभार मानले.

कलाकारांनी राजश्रीच्या पोस्टवर केल्या कमेंट्स

राजश्री देशपांडेच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स करून तिला या आजाराचा सामना करण्यासाठी धीर दिला आहे. श्रिया पिळगांवकरने ‘राज’ अशी कमेंट केली आहे. तर लॉरेन गॉटलिब, शहाना गोस्वामी, अमृता खानविलकर, मंजिरी फडणीस, किरण राव, तिलोत्तमा शोम, गौरव आदर्श या कलाकारांनीही कमेंट्स केल्या आहेत. स्पृहा जोशीने लवकर बरी हो, असं म्हटलंय. तर अमृता खानविलकरने तुला खूप प्रेम आणि हिंमत अशी कमेंट केली आहे. काळजी घे गं.. लव्ह यू रॉकस्टार अशी कमेंट छाया कदम यांनी केली आहे.

राजश्री देशपांडेचे करिअर

राजश्री देशपांडे अँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो, द स्काय इज पिंक, चोक्ड, जोराम, सत्यशोधक या चित्रपटांसाठी ओळखली जाते. तिने सेक्रेड गेम्स या नेटफ्लिक्सवरील गाजलेल्या सीरिजमध्ये तिने सुभद्राची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ती मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली. द फेम गेम, ट्रायल बाय फायर, ब्लॅक वॉरंट या सीरिजमध्येही तिने विविध भूमिका केल्या होत्या.