Sai Pallavi Replacing Deepika Padukone In Kalki 2898 AD : दीपिका पादुकोण बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. दीपिका तिच्या तत्वांनुसार काम करते, पण तिला यामुळे काहीवेळा चांगले चित्रपटही गमवावे लागले आहेत. यापैकीच एक म्हणजे ‘कल्की २८९८ एडी.’

नाग अश्विन दिग्दर्शित २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. प्रेक्षकांनी चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, अमिताभ बच्चन व दीपिका पादुकोण हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये होते. चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, यावेळी प्रेक्षकांना दीपिका पादुकोण यामधून पाहायला मिळणार नाही.

कल्कीच्या सीक्वलमध्ये झळकणार साई पल्लवी

सप्टेंबर २०२५ मध्ये संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरीट’मधून एक्झिट घेतल्यानंतर दीपिकाची ‘कल्की २८९८एडी’मधूनही एक्झिट झाली. दिवासाला फक्त ८ तास काम करणार अशी अट अभिनेत्रीने ठेवली होती. यामुळे संदीप रेड्डी वांगा व तिच्यामध्ये मतभेद झाले होते’ अशीही चर्चा होती; तर ‘कल्की’मधून एक्झिट घेण्यापूर्वी अभिनेत्रीने २० दिवसांसाठी चित्रपटाचं शूटिंगही केलं होतं. अशातच आता ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार ‘कल्की’ चित्रपटाची टीम दीपिकाची रिप्लेसमेंट म्हणून दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची निवड करण्याबद्दल चर्चा करत आहेत.

‘कल्की’ चित्रपटाच्या टीममधील एका व्यक्तीने उल्लेख केलेल्या माध्यमाशी संवाद साधताना सांगितलं की “अद्याप काहीही ठरलेलं नाहीये, पण हो, दीपिकाच्या एक्झिटनंतर मेकर्स साईचा विचार करत आहेत. त्यांना साई त्या भूमिकेसाठी योग्य वाटत आहे.” यावेळी त्यांनी साईच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे आणि स्वत: दिग्दर्शक नाग यांनीच तिची निवड केली आहे अशा अफवा खोट्या असल्याचं म्हटलं आहे. याबद्दल ते म्हणाले, “या सगळ्या अफवा आहेत, अद्याप काहीही ठरलेलं नाहीये, थोडी वाट पाहा.”

दरम्यान, ‘कल्की’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता; तर यातील अमिताभ बच्चन यांच्या कामाचं प्रेक्षकांकडून विशेष कौतुक झालं होतं. त्यामुळे आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटात आता दीपिकाच्या जागी नेमकी कोणती अभिनेत्री झळकणार याचं उत्तर येत्या काळातच मिळेल.