Ramayana Trailer : भारतीय संस्कृतीतील महाकाव्य रामायण हे आता भव्य सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पौराणिक इतिहास हा आधुनिक पद्धतींचा वापर करून सिनेमाच्या स्वरूपामध्ये मांडण्यात येणार आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा महत्त्वाकांक्षी रामायण हा सिनेमा दोन भागांमध्ये रिलीज होणार असून, सिनेमाच्या प्रमोशनचा पहिला इव्हेंट पार पडला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या, तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. सीतेच्या भूमिकेसाठी वेगळ्या पद्धतीची तयारी केल्याचा खुलासा साई पल्लवीनेही केला आहे.
नवी दिल्लीमध्ये रामायण सिनेमाच्या ‘प्रथम संकल्प’ या प्रमोशनल इव्हेंटचे आयोजन करण्यात आले. त्यामधून सिनेमाच्या प्रमोशनला जबरदस्त सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी सीतेची भूमिका साकारणाऱ्या साई पल्लवीने तिला भूमिका साकारताना आलेले अनुभव आणि तिचे विचार मांडले आहेत. तसेच अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या सीतेची भूमिका प्रभावी साकारण्यासाठी शूटिंगच्या आधी ध्यानधारणा करीत असल्याचे तिने नमूद केले.
मी या भूमिकेची निवड केली नाही – साई पल्लवी
‘रामायण’च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये साई पल्लवीने सीतेच्या भूमिकेबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, “सीतामातेची भूमिका साकारण्याची संधी मिळाली हा खरं तर त्यांचा आशीर्वाद आहे. मी या भूमिकेची निवड केली नाही, तर हा माझ्यासाठी एक प्रकारे आशीर्वाद आहे. अगदी सहजरीत्या ही भूमिका मिळेल आणि कागदावर लिहिल्याप्रमाणे पात्र साकारता येईल, अशी ही भूमिका नाही. त्यासाठी मी दररोज ध्यानधारणा करीत असे.”
पुढे ती म्हणाली की, मी भूमिका करताना माझ्या माध्यमातून सीतामातेने त्यांची गोष्ट मांडावी, अशी माझी इच्छा होती. मी जे काही साकारेन ती सीतामातेची इच्छा आहे, असा विश्वास मी ठेवला. या भूमिकेचं सर्वोत्तम रूप पडद्यावर साकारलेलं दिसावं म्हणून मी माझ्या विचारांमध्ये जमेन तेवढी शुद्धता आणि तटस्थता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
तीन वर्षे या चित्रपटावर काम केलंय – साई पल्लवी
पुढे ती म्हणाली, “कलाकारांना अशा भूमिका सहजरीत्या मिळत नाहीत. देवीची भूमिका साकारणं हे तर खूप कठीण काम आहे. जगासमोर सर्वोत्तम रूप सादर करण्यासाठी संपूर्ण टीमला खूप मनापासून आणि झोकून देऊन काम करावं लागतं. कारण- असे चित्रपट हे पुढे इतिहासाचा एक भाग बनतात. हा माझ्यासाठी हा खूप शिकण्याचा मोठा अनुभव होता. मी या चित्रपटावर तीन वर्षं काम केलंय; पण संपूर्ण टीम तर गेली १० वर्षं यासाठी मेहनत घेत आहेत.”
‘रामायण’ सिनेमामध्ये कोणते कलाकार साकारणार भूमिका?
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या रामायण या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची निर्मिती दोन भागांमध्ये करण्यात येत आहे. वाल्मीकी रामायणावर आधारित या सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी सीतामाता, सनी देओल भगवान हनुमान; तर अभिनेता यश रावणाचे पात्र साकारणार आहे. त्यासह रवी दुबे लक्ष्मण हे भूमिकेत दिसणार आहेत. त्याशिवाय काजल अग्रवाल मंदोदरी, लारा दत्ता कैकेयी, अरुण गोविल राजा दशरथ, रकुल प्रीत सिंह शूर्पणखा व शीबा चड्ढा मंथरा यांच्या भूमिका साकारणार आहेत. तगडी स्टारकास्ट, अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्स, मोठे बजेट आणि भव्य निर्मितीमुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
दिल्लीमध्ये आयोजित भव्य कार्यक्रमाने चित्रपटाच्या प्रमोशनला जोरदार सुरुवात झाली. या विशेष कार्यक्रमात ट्रेलरची पहिली झलक दाखवण्यात आली, तसेच चित्रपटाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी तो कॉमिकमध्ये प्रदर्शित करण्याची घोषणाही करण्यात आली. रामायण या पौराणिक चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
