Saif Ali Khan and Amrita Singh : सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा १९९१ मध्ये लग्न झालं आणि २००४ मध्ये दोघे विभक्तही झाले. दोघांमध्ये वयाचा १२ वर्षांचा फरक होता. सैफच्या आई शर्मिला टागोर यांना तर हे नातं मान्यही नव्हतं. त्यांनी सैफला अमृताबरोबर लग्न न करण्याचा सल्लादेखील दिला होता. सैफ आणि अमृता यांना दोन मुलं आहेत, ती म्हणजे सारा आणि इब्राहिम.

अमृताबरोबरच्या घटस्फोटानंतर आपली मुलं आपल्यापासून आणि आपल्या धर्मापासून दूर जातील, अशी काळजी सैफला वाटत होती. याबद्दल अभिनेत्याने एका जुन्या मुलाखतीत म्हटलेलं, “मला माझी दोन्ही मुलं इस्लामी परंपरेबद्दल कधीच काही जाणून घेऊ शकणार नाहीत असं वाटत होतं.”

अमृता ही मुस्लीम समाजसेविका रुखसाना सुलताना (आई) आणि पंजाबी जाट शीख शिविंदर सिंग विर्क (वडील) यांची मुलगी, तर सैफ हा पतौडी कुटुंबातला होता. सैफची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी त्यांचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी लग्न केल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारला होता. पण सैफने अमृताला कधीही इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितलं नाही. याबद्दल त्याने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती.

सैफ म्हणालेला, “अमृताला कधीही इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितलं नाही. आमच्यात सुरुवातीपासूनच ‘प्रत्येकाच्या धर्माचा आदर’ या तत्त्वाचे पालन केलं गेलं. अगदी माझ्या मुलांनाही (सारा आणि इब्राहीम) आम्ही हेच शिकवलं. अमृता गुरुद्वाऱ्यात प्रार्थनेसाठी जात असे. त्यावेळी मी घरी मुलं सांभाळायचो. माझी कधीच अशी इच्छा नव्हती की, सारा आणि इब्राहिम यांनी फक्त इस्लाम धर्माबद्दल माहिती घ्यावी. मला असं वाटतं, मुलांनी सर्व गोष्टी शिकायला हव्यात आणि त्यांच्या सन्मान करायला हवा.”

स्वत:च्या धार्मिक ओळखीबाबत साराने एका कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली होती. आई हिंदू आणि वडील मुस्लीम असल्याबद्दलचे प्रश्न तिला लहानपणी पडायचे. याबद्दल ती म्हणालेली, “मी खूप लहान होते, शाळेत होते. माझे आई-वडील एकत्र असताना माझ्या मनात नेहमी प्रश्न येत असे की, अमृता सिंग, सैफ पटौदी, सारा सुलताना, इब्राहीम अली खान… हे सगळं काय आहे? आपण नक्की कोण आहोत? त्यावेळी मी माझ्या आईला विचारलेलं, ‘मी कोण आहे?’ तेव्हा तिने उत्तर दिलं होतं, ‘तू भारतीय आहेस.’ तिचे ते शब्द मी कधीच विसरू शकणार नाही.”

सारा आणि इब्राहिम दोघे धर्मनिरपेक्ष आहेत. सारा अनेकदा हिंदू मंदिरं आणि तीर्थस्थळांना भेटी देत असते. या मंदिरांतले फोटोसुद्धा ती आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते.