Saif Ali Khan charity cricket match : नवाब सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान पतौडी हे माजी क्रिकेटपटू होते. आता सैफनेही पांढरे कपडे परिधान करून इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू उस्मान अफझाल आणि मॉन्टी पानेसर यांच्याबरोबर एका चॅरिटी सामन्यात भाग घेतला आणि थेट अर्धशतक ठोकले. या सामन्याचा मुख्य उद्देश गरजू लहान मुलांची मदत करणे हा होता. सैफबरोबर त्याची मुलं तैमूर, जेहदेखील होते.

ल्युटन टाऊन आणि इंडियन्स क्रिकेट क्लब यांच्यात झालेल्या या चॅरिटी सामन्यात सैफने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. या सामन्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यात सैफ इतर खेळाडू आणि प्रेक्षकांबरोबर क्रिकेटचा आनंद घेताना दिसत आहे. या सामन्यात त्याने अर्धशतकही झळकावले.

या अनुभवाबद्दल सैफ अली खान म्हणाला, “उन्हात माझ्या मुलांसमवेत क्रिकेट खेळण्याचा हा एक अतिशय चांगला दिवस होता. माझ्या मुलांचा इंग्लंडमधील हा कदाचित पहिलाच काउंटी सामना होता. हा क्रिकेट खेळायला शिकण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.”

क्रिकेटच्या सामन्याबद्दल सैफ म्हणाला…

अशा चॅरिटी सामन्यांचे महत्त्वही सैफ अली खानने सांगितले. “मला असं वाटतं की या जगात एका बाजूला खूप श्रीमंती आहे आणि दुसऱ्या बाजूला खूप गरिबी आहे. त्यामुळे दयाळूपणा, दानशूरता आणि सहानुभूती या गोष्टी आपण सर्वांनी थोड्या जास्त प्रमाणात केल्या पाहिजेत. चॅरिटी करून तुम्ही चांगलं काम करताय. आयोजक असे सामने खेळवतात त्याबद्दल त्यांचेही कौतुक आहे. मीही इथे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो,” असं सैफ अली खान म्हणाला.

हा सामना नेमका कशासाठी होता?

या चॅरिटी सामन्यासाठी अनेक नामांकित व्यक्ती एकत्र आल्या होत्या. यामध्ये सैफ अली खान, त्याची मुलं तैमूर आणि जेह, चित्रपट निर्माते निखिल द्विवेदी, ‘समीना कॅपिटल’चे संस्थापक शिरीष सराफ, ‘डाबर’चे चेअरमन मोहित बर्मन, ‘आयनॉक्स जीएफएल ग्रुप’चे कार्यकारी संचालक देवांश जैन आणि इतर अनेकांचा समावेश होता. या सामन्याचा मुख्य उद्देश खेळाच्या माध्यमातून लहान मुलं आणि गरजूंची मदत करणे हा होता.

दरम्यान, सैफ अली खान अलीकडेच नेटफ्लिक्सवरील ‘कर्तव्य’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात रसिका दुगल, संजय मिश्रा, झाकीर हुसेन आणि सौरभ द्विवेदी यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तो लवकरच ‘हैवान’ या चित्रपटात दिसणार आहे. हा ‘ओप्पम’ या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार देखील मुख्य भूमिकेत आहे. तसेच, राहुल ढोलकिया यांच्या ‘हम हिंदुस्तानी’ या नेटफ्लिक्सच्या आगामी वेब सीरिजमध्येही सैफ महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.