बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान सध्या चर्चेत आहे. त्याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर या प्रकरणी विविध अपडेट समोर येत आहेत. अशात सैफ अली खानच्या जुन्या मुलाखतीतला एक किस्सासुद्धा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईच्या जुहू परिसरात आपलं हक्काचं घर असावं असं स्वप्न प्रत्येक जण पाहतो. सैफलाही येथे घर येण्याची इच्छा होती. मात्र, त्याला येथे घर देण्यासाठी नकार देण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

सैफ अली खानने त्याच्या जुन्या मुलाखतीत त्याला जुहूमध्ये घर का घेता आलं नाही याचं कारण सांगितलं आहे. तसेच त्यावेळी आलेला अनुभव सांगितला आहे. सैफला त्याच्या धर्मामुळे मुंबईतील जुहूमध्ये घर खरेदी करण्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं, असा खुलासा त्याने या मुलाखतीत केला होता.

सैफ त्या मुलाखतीमध्ये नेमकं काय म्हणाला होता?

सैफ अली खान नेहमीच त्याच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखला जातो. एखाद्या विषयावर तो नेहमी मोकळेपणाने मत व्यक्त करतो. घर खरेदी करतानाचा अनुभव सांगताना तो म्हणाला होता, “मुस्लीम असताना मुंबईच्या जुहूमध्ये घर विकत घेण्याचा प्रयत्न केल्यास, तुम्हाला हे सांगून नकार दिला जाईल की, तुम्ही मुस्लीम आहात.”

मुलाखतीत सैफला पुढे भारताबाहेरदेखील कुठे भेदभावाचा सामना करावा लागला का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला होता की, “अमेरिकेत असा अनुभव आला नाही. मात्र, भारतात याचा सामना करावा लागला.”

पुढे मुलाखतीत त्याने सांगितलं होतं, “भारतात धार्मिक तणाव आहे आणि कदाचित हेच एक मोठं वैशिष्ट्य आहे. मानवी स्वभाव फार वेगळा आहे. तो कधीच सामान्य असू शकत नाही. एक व्यक्ती आपल्या आसपासच्या अनेक व्यक्तींशी भांडतो. पत्नी, भाऊ यांच्याशी भांडणे होतात. तसेच एक देश दुसऱ्या देशाशी भांडतो आणि एक धर्म दुसऱ्या धर्माशी भांडतो, हे स्वाभाविक आहे.”

सैफ अली खान चाकू हल्लाप्रकरण

१६ जानेवारीला सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला झाला होता. या हल्ल्यात सैफ जखमी झाल्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हल्ल्यामध्ये सैफच्या पाठीला दुखापत झाली होती. तसेच चाकूचे एक टोक त्याच्या पाठीत अडकले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर सैफला २१ जानेवारीला घरी सोडले. या प्रकरणी पोलिसांकडून वेगाने तपास सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं या आरोपीचं नाव आहे. पोलिस त्याच्या बोटांच्या ठशांवरून पुढील तपास करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan had said when he trying to buy home in mumbai juhu people was declined being a muslim rsj