Saif Ali Khan Instagram Debut first post: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने सोशल मीडियावर नवा प्रवास सुरू केला आहे. नेहमी सिनेमांमध्ये झळकणारा सैफ आता इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालणार आहे. सैफने इन्स्टाग्रामवर अधिकृतपणे पदार्पण केले आहे. अनेक वर्षे सोशल मीडियापासून दूर राहिल्यानंतर त्याने स्वतःचे अधिकृत अकाउंट सुरू केले आहे.
सैफ अली खानच्या सिनेमांची अनेकदा चर्चा रंगते, पण त्याचे वैयक्तिक आयुष्य फारसे तो शेअर करत नाही. सैफने त्याचे वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियापासून दूर ठेवले होते. पत्नी करीना कपूर खानच्या सोशल मीडिया पोस्टमधून तो अनेकदा दिसून येतो, मात्र त्याचे स्वतःचे असे पब्लिक अकाउंट नव्हते. आता इन्स्टाग्रामवर आल्यानंतर सैफ अली खानने आतापर्यंत एकच पोस्ट केली आहे.
सैफ अली खानने दाखवली पतौडी लायब्ररी
सैफ अली खानने पहिल्या पोस्टमध्ये पतौडी लायब्ररीमधील फोटो शेअर केला आहे. मागे ग्रंथालय असून तो सोफ्यावर बसून पुस्तक वाचत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी त्याने फॉर्मल लूक स्टाइल केला आहे. इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट शेअर करत सैफने लिहिले, “पतौडी लायब्ररी… पुस्तकांच्या मुखपृष्ठावरूनच त्यांचा अंदाज घेताना…”.
२०२४ मध्ये ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सैफने त्याच्या प्रायव्हेट इन्स्टाग्राम अकाउंटबद्दल सांगितले होते. तो कधीकधी या अकाउंटवरून पोस्ट पाहत असायचा, मात्र सोशल मीडिया वापरण्याची त्याला जास्त आवड नव्हती. सैफ म्हणालेले, “माझ्या फोनमध्ये इन्स्टाग्राम अॅप असून माझे सिक्रेट अकाउंटही आहे. मी कधीकधी त्यावरून पोस्ट पाहत असतो, पण मला त्यातून जास्त काही आनंद मिळत नाही. दुसऱ्यांच्या गोष्टींचे प्रमोशन करण्यात मला काही अडकायचे नाही. मी सोशल मीडियावर नाही हे लोकांना माहीत असल्यामुळे कोणीही माझ्याकडून काही प्रमोट करण्याची अपेक्षा करत नाही, त्यामुळे मला शांतता मिळते.”
